वडवळ : बंगळूरू येथील गिफ्टएबल फौंडेशन आणि शेटफळ (ता.मोहोळ) येथील व्हाईस ऑफ व्हाईसलेस अभियान यांच्या वतीने ‘अर्ली इंटरवेंशन ॲण्ड अर्ली एज्युकेशन’ हा प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला. या दोन्ही संस्थांतर्फे जिल्ह्यातील कर्णबधिर बालकांसाठी मुकेपणा निर्मूलनाचा हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या ऑनलाईन उद्घाटन प्रिसिजन केमशॉफ्ट लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांच्या हस्ते झाले.
आगामी तीन वर्षांत श्रवणयंत्रे आणि स्पीच थेरपी या माध्यमातून कर्णबधिरांना दिलासा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास गिफ्टएबलचे प्रतीक कौल, दिव्या कार्तिक, देवदास निराकर, बोलवाडी प्रकल्पाच्या जयप्रदा भांगे, नवनाथ शिंदे, कैलास काटकर, नवनाथ धुरुपे, नामदेव मल्लाव, चंद्रकांत वाघ, वासंती गावंधरे, योगेश भांगे उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात प्रिसिजन कंपनी आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून घेतलेल्या ताटवाटी चाचणीतून आढळलेल्या बालकांना बोलायला शिकविण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. या प्रकल्पांतर्गत समाविष्ट बालकांना गिफ्टएबल दर्जेदार श्रवणयंत्रे घेऊन देणार आहे तर व्हाईसलेसच्या ‘बोलवाडी’ विभागाचे यशस्वी पालकांचा गट या बालकांना बोलायला शिकविण्याचे काम करणार आहे.
या उपक्रमासाठी सर फौंडेशनचे जिल्हा समन्वयक राजकिरण चव्हाण, प्रसून भांगे व दीपक कुंभार यांनी परिश्रम घेतले.
----