मना मानसी दुख आणू नको रेमना सर्वथा शोक चिंता नको रेविवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावीविदेहीपणे मुक्ति भोगीत जावीसंत ज्ञानेश्वर जेव्हा म्हणतात,विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशलेअवघेची जाले देह ब्रह्म तेव्हा येणारी अनुभूती स्वतचा शोध घ्यायला लावणारी असते. अशी अनुभूती मनाला उभारी देते, भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते आणि अर्थातच मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरते. अध्यात्म आणि धर्म या गोष्टी समान नाहीत. अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव, अशी शक्ती किंवा असे कोणीतरी, असते हे आध्यात्मिक माणूस मानतो अथवा नाही मानत.
आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात. धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो. पण खूप वेळा धार्मिकता ही रूढी-परंपरा, परमेश्वरस्तुती, पूजा-अर्चा, प्रार्थना यातून व्यक्त होते. याउलट आध्यात्मिकतेला कर्मकांडाचे बंधन नाही. असे असले तरी धार्मिकता, धर्मश्रद्धा आणि आध्यात्मिकता हातात हात घालून चालतात. अध्यात्माकडे ओढा असलेले अनेकदा धार्मिकसुद्धा असतात. धार्मिक ग्रंथांचे वाचन, निरूपण करणे, त्यांच्या अर्थाविषयी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभाग घेणे, जप, नामस्मरण यातून मन शांत करणे, ध्यानधारणेतून मनशक्ती वाढवणे अशा वेगवेगळ्या पद्धतींनी स्वत:चा शोध घेतला जातो.
आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते. नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या कालाविष्कारांतूनही आध्यात्मिकता व्यक्त होते. निसर्गाच्या सान्निध्यातही एक अवर्णनीय मानसिक शांती प्राप्त होते. प्रार्थनेतही अंतर्मुख करण्याची, लीनता निर्माण करण्याची, विनम्र भाव निर्माण करण्याची शक्ती असते. मोठयाने उच्चारलेले मंत्रोच्चारण, एखादे ठेक्यात आणि तालात एकत्र म्हटलेले भजन, चर्चमध्ये गायली जाणारी ईशस्तुती, प्रवचन या सगळ्यातून अमाप मनशांती आणि समाधान मिळते. आपल्याकडे संतसाहित्यही आध्यात्मिकतेतून मनाचा विचार मांडताना दिसते.
आजच्या संघर्षमय जीवनात, मनशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक गोष्टींची प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो. मनात निर्माण होणाºया चिंता, विषाद, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सवार्चा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टींप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो. आत्तापर्यंतच्या विविध शास्त्रीय संशोधनातून हे लक्षात आले आहे.