सोलापूर : सिद्धरामेश्वर महाराज यांच्या हातातील योगदंडाची पूजा शनिवारी दुपारी शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात अॅड. रितेश थोबडे यांच्या हस्ते विधीवत करण्यात आली. योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्वर महाराज अक्षता सोहळ्यातील धार्मिक विधीस प्रारंभ झाला.
अक्षता सोहळ्याच्याआधी नववधूवरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवू घालण्याची प्रथा आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज सुमारे नऊशे वषार्पूर्वी कसब्यातील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात येऊन जेवण केले होते. तीच परंपरा कायम ठेवून सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडास केळवणासाठी शेटे यांच्या वाड्यात आणून, केळीच्या पानात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मनोभावे विधीवत पूजा केली जाते.
शनिवारी दुपारी साडेबारा वाजता मानकरी शिवशंकर कंठीकर यांनी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड कै. शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले. यावेळी मानकरी हिरेहब्बू हे शेटे वाड्यात आल्यानंतर योगदंडास चौरंगी पाटावर ठेऊन विभुती, कुंकुम, फुले वाहून संबळाच्या निनादात विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर होमहवन करण्यात आले. शेटे यांचे वारसदार व अॅड. मिलिंद थोबडे त्यांचे चिरंजीव अॅड. रितेश थोबडे यांनी हिरेहब्बू यांची पाद्यपूजा केली.
केळीच्या पानामध्ये योगदंडास पुरणपोळीचा नैवैद्य दाखविण्यात आला. यावेळी शेटे यांचे वारसदार अॅड.मिलिंद थोबडे यांना १९८७ पासून सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंडाची पूजा करण्याचा मान आहे. जानेवारी २०१२ साली अॅड. मिलिंद थोबडे यांनी योगदंडाची पूजा करण्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांनी आपले वारसदार व मुलगा अॅड. रितेश थोबडे यांच्याकडे पूजा करण्याचा मान सुपूर्द केला. योगदंडाची पूजा करण्याचा मान अॅड. रितेश थोबडे यांना गेल्या काही वर्षापासून आहे.