कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळावेत. यासाठी खाजगी डॉक्टर, औषध विक्रेत्यांची पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, पोलीस निरिक्षक अरुण पवार, किरण अवचर, प्रशांत भस्मे, खाजगी डॉक्टर व औषध विक्रेते उपस्थित होते.
कोरोनाबाधित रग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन वाटपावर प्रशासनाचे नियंत्रण असून, रेमडेसिविर इंजेक्शनची खाजगीत कुठेही विक्री होणार नाही. अन्न औषध प्रशासनाच्या नियंत्रणात खाजगी कोविड रुग्णालयात इजेक्शन विक्री करण्यात येईल. खाजगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनुसार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येईल. उपलब्ध इंजेक्शन गंभीर रुग्णांना प्राधान्याने गरजेनुसार द्यावे. डॉक्टरांनी बाहेरून इंजेक्शन आणायला लावू नये. उपलब्ध इंजेक्शनपैकी १० टक्के साठा हा फ्रंटलाइन वर्कर्ससाठी ठेवण्यात येईल, असेही प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.
शहरात वाॅर्डस्तरीय व ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती
कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात वाॅर्डस्तरीय व ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती कार्यरत ठेवाव्यात. रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी कोविड केअर सेंटर उभारणीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. औषधांचा काळाबाजार व साठेबाजीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविरवर नियंत्रण आणले आहे. रुग्णालयांना ऑक्सिजनपुरवठा सुरळीत राहील, यासाठी जिल्हास्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व खाजगी रुग्णालये व औषध विक्रेत्यांनी कोविड नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, अशा सूचनाही गुरव यांनी दिल्या.