सोलापूर : रेमडेसिविर औषधाचा मारा अधिक झाल्यास किडनी आणि लिव्हरवर परिणाम होऊन कमकुवत बनतात. ऑक्सिजन व्यवस्थित राहिल्यास ८० टक्के कोरोना रुग्णांना रेमडेसिविर औषध देण्याची आवश्यकता नसते, असे सोलापूर शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त उपस्थित होते. रेमडेसिविरसाठी डॉक्टरांपेक्षा रुग्णांकडून अधिक मागणी आणि आग्रह असल्याचा दावा पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
रुग्णांचा आग्रह असल्यास डॉक्टरांनी एकाच वेळी सहा-सहा इंजेक्शन लिहून देणे कितपत योग्य आहे, या औषधाची मूळ किंमत आणि डॉक्टरांकडून आकारली जाणारी किंमत यात प्रचंड तफावत आहे. पैशांकरिता डॉक्टर आवश्यकता नसतानाही रेमडेसिविर लिहून देताहेत, अशी माहिती आणि त्या संबंधित काही प्रकरणे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पालिका आयुक्त निरुत्तर झाले. आयुक्तांच्या निराधार दाव्यामुळे त्यांनी त्यांच्यावर पत्रकारांचा रोष ओढवून घेतला.
शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रेमडेसिविरला मागणी येत आहे. त्यामुळे रेमडेसिविरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे आणि यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार फोफावला असून, औषधाचा कृत्रिम तुटवडा डॉक्टरांकडून सुनियोजित होत असल्याची अनेक उदाहरणे पत्रकारांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. पत्रकार मंडळी पुराव्यानिशी बोलत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिका आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात शहर व ग्रामीण भागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत रेमडेसिविरचा तुटवडा, ऑक्सिजन पुरवठा, तसेच खाटांची उपलब्धता याबाबत विस्तृत चर्चा झाली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन बैठकीनंतर निघून गेले. त्यानंतर दुपारी दोन वाजता पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद झाली.
आयुक्त म्हणाले, रुग्णांना प्रिस्क्रिप्शन लिहून औषध मागविण्याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांना सांगितले आहे. त्यामुळे आता यापुढे डॉक्टरच रेमडेसिविर मागवून घेतील. यापुढे मेडिकलमधून आता हे औषध मिळणार नाही. यासोबत ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात रुग्णालयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. ऑक्सिजन डीलर व्यवस्थित पुरवठा करतोय की नाही, याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला आहे.