सोलापूर : हुतात्मा स्मृती मंदिरच्या नूतनीकरणाचे काम व्यवस्थित झाले नसून, अद्यापही बऱ्याच त्रुटी आहेत. या नाट्यगृहाचे काम परिपूर्णच झाले पाहिजे. त्याशिवाय नूतनीकरणाचे उद्घाटन होऊ द्यायचे नाही, अशी भूमिका आज सोलापुरातील कलावंत आणि रसिकांनीही घेतली. शिवसेना नेते आणि प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांनी हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात येथील कलावंत आणि रसिकांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी या नाट्यगृहाच्या हितासाठी तीव्र भावना व्यक्त झाल्या. बांदेकर यांनी शुक्रवारी शिवसेनेचे नगरसेवक आणि काही कलावंतांसमवेत ‘हुतात्मा’ची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी नूतनीकरणाच्या कामावर नाराजी व्यक्त करून शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना प्रसंगी रस्त्यावर उतरण्याच्या सूचना दिल्या होत्या. सोलापुरातील सर्वच क्षेत्रातील कलावंत आणि रसिकांनीही याप्रश्नी भूमिका घ्यावी, या हेतूने बांदेकर यांनी आज ही बैठक घेतली.ज्येष्ठ रंगकर्मी कमलप्रभा हावळे म्हणाल्या की, नाट्यगृह पुन्हा सुरू होण्यास उशीर झाला तरी चालेल; पण नूतनीकरणाचे काम परिपूर्णच व्हायला हवे. शोभा बोल्ली यांनीही हीच भूमिका घेऊन माध्यमांनी हा प्रश्न उचलून धरावा, असे आवाहन केले. हुतात्माच्या कामासाठी आजवर जो खर्च झालेला आहे तो व्यर्थ असून, आर्किटेक्चर अजित हरिसंगम यांनी नाट्यगृहाचे काम करताना कलावंतांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप आशुतोष नाटकर यांनी केला. गुरू वठारे म्हणाले, महापौरांचे हुतात्माच्या नूतनीकरणावर समाधान झाले नाही. याशिवाय राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.या बैठकीस जॉन येवलेकर, शकूर सय्यद, बागवान, म्युझिकल आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद खरात, विकास नागावकर, शहाजी भोसले यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.--------------------------------...तर कलावंत पुढे येतीलमहापालिकेने जर नूतनीकरणाचे काम व्यवस्थित करण्यात असमर्थता व्यक्त केली तर आम्ही मुंबईचे कलावंत आणि सोलापूरचे कलावंत एकत्र येतील आणि हे काम करतील. आम्ही जेव्हा हे काम करू तेव्हा महाराष्ट्रातील नाट्यगृह उभा करू. हे काम पालिका करतेय, ते त्यांनीच करावे; पण कलावंतांना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा आदेश बांदेकर यांनी व्यक्त केली.
‘हुतात्मा’चे नूतनीकरण परिपूर्णच हवे
By admin | Published: July 20, 2014 12:39 AM