पुणे-सोलापूर रोड हा पूर्वी शहरातून जात होता. शहराबाहेरून बायपास झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अंतर्गत रस्त्याची कुठलीच दुरुस्ती झाली नव्हती. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अंतर्गत रस्त्याचे काम व्हावे यासाठी तत्कालिन भाजप तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून अंतर्गत रस्त्यांसाठी मंजुरी घेऊन त्याचे उद्घाटन झाले होते, परंतु गेल्या पाच वर्षांत या कामाची परिस्थिती जैसे थे होती. यापूर्वीही या रस्त्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने संजय कोकाटे यांनी केली.
आता पुन्हा २६ मार्च रोजी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊन पाच वर्षे पूर्ण झाली, परंतु काम झाले नाही म्हणून गांधीगिरी पद्धतीने प्रकल्प संचालक नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या खुर्चीचा सत्कार संजय कोकाटे यांनी केला होता. यापुढे चीफ जनरल मॅनेजर मुंबई यांचा सत्कार करावयाचा कोरोनामुळे पुढे ढकलला. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार करावयाचा होता, तत्पूर्वीच टेंभुर्णी अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी ५० कोटी रुपये मंजूर केल्याचे ट्वीट दस्तुरखुद्द नितीन गडकरी यांनी केले आहे.
सव्वा सहा किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे नव्याने बांधून तो रस्ता स्थानिक प्रशासनाकडे वर्ग करण्यात येणार आहे. टेंभुर्णी शहरातील नागरिकांची बऱ्याच दिवसांची प्रलंबित मागणी मान्य झाली. आता प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होईल, याबाबत नागरिकांत उत्सुकता आहे.
आढेगाव भुयारी मार्गासाठी २० कोटी निधी
आढेगाव या ठिकाणी भुयारी मार्ग करणे या कामासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिलेली असूनही निधीअभावी रस्त्याचे काम सुरू झालेले नव्हते. या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची तरतूद होण्यासाठी आमदार बबनराव शिंदे यांनी पत्रव्यवहार करून वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून तो निधी मंजूर झाला आहे.