संताजी शिंदे, सोलापूर : महिना दोन लाख १० हजार रूपये भाडे तत्वावर नेलेला पोकलेन व ब्रेकर मशिन गायब करून, ३७ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरूद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सतीश चव्हाण (रा. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. दि. २ नोव्हेंबर २०२३ रोजी सतिश चव्हाण याने सुनिलराणा बाबुराव जगताप-पाटील (वय ४० रा. वैष्णवी नगर, सैफुल विजापूर रोड सोलापूर) यांना फोन केला. ३५ लाख रूपये किंमतीचा पोकलेन मशिन व दोन लाख रूपये किंमतीचा ब्रेकर भाड्याने मागणी केली. दोन्ही मशिनच्या भाड्यापोटी दोन लाख १० हजार रूपये देण्याचे अमिष दाखवले. सुनिलराणा जगताप-पाटील यांचा विश्वास संपादन करून सतीश चव्हाण याने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी 'एसआरपीएफ' ग्रुप नं.१० विजापूर रोड येथील कडेला असलेल्या मोकळ्या मैदानात ट्रेलर पाठवून दिला. ठरल्याप्रमाणे ट्रेलरमध्ये पोकलेन व ब्रेकर लोड करून दिला.
पोकलेन व ब्रेकर घेऊन गेल्यापासून सतिश चव्हाण याने दोन्ही मशिन कोठे आहेत याची माहिती दिली नाही. तसेच ठरल्याप्रमाणे दोन्ही मशिनचे भाडेही दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनिलराणा जगताप-पाटील यांनी विश्वासघात करून फसवणूक केल्याची फिर्याद विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिली. तपास पोलिस उपनिरीक्षक तरंगे करीत आहेत.