२३ डिसेंबरपासून ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन अर्ज भरण्याची मुदत होती. या सात दिवसांच्या कालावधीत ३ सुट्या आल्या, तर ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची पद्धत यंदा प्रथमच असल्याने संबंधित साइट दोन दिवसांपासून हँग होत होती. त्यामुळे अनेक इच्छुकांना अर्ज अपलोड होत नसल्याने उशीर होत होता. त्यामुळे तीस डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन भरावेत, अशा सूचना मंगळवारी सायंकाळी काढल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी इच्छुकांनी उशिरापर्यंत तोबा गर्दी केली. या अर्जांची छाननी गुरुवारी दिवसभर होणार आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावात या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक गावातील इच्छुकांनी बुधवारी शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज ऑनलाइनबरोबरच ऑफलाइनही भरण्याची आयोगाने संधी दिल्याने तहसीलच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यासाठी दिवसभर एकच गर्दी झाली. यात अनेक जण सध्या कोरोना आहे हेच विसरल्याचे दिसून आले. यावेळी काही इच्छुक उमेदवार तर सभागृहात विनामास्क, विनाडिस्टन्स, विनासॅनिटायझरचे वावरत असल्याचे दिसून आले.
---तरुणाईचा सहभाग लक्षणीय.....
यावेळी निमगाव (टें.), जामगाव, अरण, वडाचीवाडी (त.म.) यांसह येथील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होणार आहेत. या दृष्टीनेच तेथील पार्टी लीडरने उमेदवारी अर्ज दाखल केले; परंतु कोणती गावे बिनविरोध होणार आहेत, हे अर्जांची छाननी व माघारी घेण्याच्या दिवशीच कळणार आहे. या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांत तरुण व युवकांचा सहभाग जास्त दिसून आला.
-----