जेऊर ग्रामपंचायतमध्ये बेकायदेशीर व्यापारीगाळे बांधून बेकायदेशीरित्या जादा पैसे घेऊन वाटप केले. तसेच आठवडा बाजार व घरपट्टी, पाणीपट्टी यातील अपहाराची चौकशी करावी, अशी मागणी जेऊर येथील ग्रामस्थ बालाजी गावडे, बाळासाहेब करचे व देवानंद पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्याची वेळेत चौकशी होत नसल्याने या तिघांनी २०१८ मध्ये पंचायत समितीसमोर ९ दिवस उपोषण केले होते.
दरम्यान, गाळेधारक न्यायालयात गेले, ग्रामपंचायतीने त्यांना विरोध करण्याऐवजी अप्रत्यक्ष सहकार्य केले. ही बाब आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणली.
चौकशीअंती पुणे आयुक्तांनी ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त केली. पुढे त्यावर उच्च न्यायालयात अपील दाखल केले, त्यात आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिली गेली.
----
खुलासे नामंजूर..रक्कम वसूल करा
तक्रारकर्ते अपहाराची रक्कम वसुलीसाठी प्रयत्नशील होते. त्यानुसार सहा. गटविकास अधिकारी आर. एम. साळुंखे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यांनी चौकशी करून संबंधितांकडून अपहराची रक्कम वसूल करून घ्यावी, असा अहवाल दिला. त्यानंतर पूर्वी दिलेल्या आदेशानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधितांचे म्हणणे घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविले होते. सदरचे खुलासे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नामंजूर करून संबंधितांकडून अपहाराची रक्कम वसूल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले आहेत.
----