२ जुलै राेजी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील नोंदणी असलेल्या ४३० दिंडी प्रतिनिधी, पालखी सोहळा विश्वस्त आणि आळंदी देवस्थान विश्वस्त यांची पंढरपूरमधील ज्ञानेश्वर मंदिरात रविवारी बैठक झाली. या बैठकीसंदर्भात ॲड. विकास ढगे यांनी माहिती दिली. यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, उमेश देसाई, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, भाऊमहाराज गोसावी, राणा महाराज वासकर यांच्यासह अन्य महाराज मंडळी उपस्थित होते.
कोरोनाचे संकट कमी झाले असले, तरी संपले नाही. यामुळे शासनाच्या निणर्यानुसार आषाढी यात्रा प्रतीकात्मक साजरी करण्याचे वारकऱ्यांनी मान्य केले आहे. एस.टी.ने प्रमुख पालख्या पंढरपूरला येणार आहेत. मात्र प्रस्थानांच्या ठिकाणी दिंडी प्रमुखांना उपस्थित राहता यावे. यंदा आषाढीला पायी पालखी सोहळा घेऊन जाण्याबाबत वारकरी आग्रही असून आम्हाला शासनाकडून अजून आशा आहे. मात्र शासनाने परवानगी न दिल्यास मात्र शासकीय नियमानुसार पालखी सोहळा करणार अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे यांनी सांगितले.
उभ्या रिंगणात अश्व असावा
परंपरेप्रमाणे अश्व प्रस्थाआला असावेत. त्याचबरोबर यंदा पालखी बसने येणार असली तरी प्रस्थानानंतर अश्वाला वाखरी येथे आणण्याची परवानगी मिळावी. वाखरी येथून पंढरपूरकडे पायी चालत जाताना अश्व सोबत असावा. पंढरपुरातील फडकऱ्यांना स्वागतासाठी परवानगी द्यावी. उभ्या रिंगणाला अश्व असावेत, अशी मागणी शासन दरबारी करण्याचे बैठकीत ठरले आहे.