सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एकाने शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला महापालिकेतील आयुक्त कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. याठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी त्याला पकडून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले आहे.
विनायक गायकवाड (रा. शहा हौसिंग सोसायटी) असे या तरुणाचे नाव आहे. ते रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव आहेत. महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालयातील अनागोंदी कारभाराबाबत गायकवाड यांनी तक्रार केली केली होती. याला भीम आर्मी संघटनेने पाठींबा दिला होता. त्यावर उप आयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी होऊन फाईल आयुक्तांकडे गेली होती.
गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने साळुंके यांच्यावर कारवाईची आयुक्तांनी शिक्षण उपसंचालकांकडे शिफारस करावी, असे गायकवाड यांचे म्हणणे आहे. वारंवार पाठपुरावा करूनही ही फाईल हलली नाही. त्यामुळे गायकवाड यांनी ८ आॅक्टोबर रोजी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात ३ नोव्हेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तरीही महापालिका आयुक्त कार्यालयाने या निवेदनाची दखल घेतली नाही.