तालुकास्तरावर नेतृत्व करणारे प्रमुख नेते व त्यांच्या गावातील निवडणुका याशिवाय मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे युवा नेतृत्वासह काही ज्येष्ठ नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंढरपूर तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी कोरोनामुळे निवडणुका घेऊ नयेत, त्या बिनविरोध कराव्यात, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तालुकास्तरावरील प्रमुख नेत्यांनीही तसे आदेश स्थानिक कार्यकर्त्यांना दिले आहेत. तरीही गाव पातळीवरील हेवेदावे, त्यामुळे काही ग्रामपंचायती वगळता निवडणुका बिनविरोध होणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. त्यासाठी काही गावांमध्ये दुहेरी तर काही गावांमध्ये तिहेरी लढती होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.
निवडणुका होत असलेल्या ७२ ग्रामपंचायतींमध्ये आ. प्रशांत परिचारकांचे खर्डी, कल्याणराव काळे यांचे वाडीकुरोली, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचे भाळवणी, पांडुरंगचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचे कासेगाव, दिवंगत आ. भारत भालके यांचे सरकोली, झेडपी सदस्य रजनी देशमुख यांचे करकंब, हरीश गायकवाड यांचे चळे, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते राजूबापू पाटील यांचे भोसे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांचे आंबेचिंचोली यांसारख्या जिल्हा, तालुकास्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या नेतेमंडळींच्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. याशिवाय गादेगाव, पटवर्धन कुरोली, भंडीशेगाव, सुस्ते, पोहोरगाव, खरसोळी, गोपाळपूर, खेडभाळवणी, बाभूळगाव, फुलचिंचोली यांसह ७२ ग्रामपंचायतींमध्ये लक्षवेधी लढतींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीमध्ये अनेक युवक स्वत:च्या खांद्यावर जबाबदारी घेऊन राजकीय मैदानात उतरले आहेत, तर काही ज्येष्ठ मंडळी आपल्या अनुभवाच्या जोरावर निवडणुकीत सक्रिय आहेत. त्यामुळे तरुणांसह ज्येष्ठांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
४२ गावांत आ. शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
पंढरपूर तालुक्यातील माढा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या ४२ गावांमधील काही गावांमध्ये निवडणुका होत आहेत. या गावांमध्ये परंपरागत आ. भालके, आ. परिचारक, कल्याणराव काळे यांचे गट तुल्यबळ आहेत. विधानसभेची पुनर्रचना झाल्यावर आ. बबनराव शिंदे यांनी या गावांमध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना व आपल्या कामाच्या जोरावर अनेक कार्यकर्ते तयार केले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत आ. शिंदे यांना सर्वच स्तरातून गटतट, पक्ष न बघता सहकार्य केल्याचे आजवरचा अनुभव आहे. आता काही शिंदे समर्थक आ. शिंदे यांच्या नावावर गावात काळे, भालके, परिचारक यांना शह देण्यासाठी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आ. शिंदे काय भूमिका घेतात याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
कोट ::::::::::::::::::::
याबाबत आपण स्थानिक पातळीवर आपल्या नावावर पॅनल टाकू नये, असे सांगितले आहे. मला सर्वांचीच मदत होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका स्थानिक पातळीवर लढाव्यात. यामध्ये आमचा कोणाला विरोध किंवा पाठिंबा असण्याचे कारण नाही.
- बबनराव शिंदे
आमदार, माढा मतदारसंघ