पालखी प्रमुख व प्रशासनामध्ये बैठक झाली. यामध्ये हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. हा तोडगा काढण्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पालकमंत्री, जिल्हा पोलीसप्रमुख, जिल्हाधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली. त्यानंतर वाखरी पालखी तळावरून प्रमुख संतांच्या पालख्या एक-एक करून पंढरपूरच्या दिशेने विसाव्यापर्यंत मार्गस्थ झाल्या.
आषाढी एकादशीसाठी पंढरीच्या वेशीवर आलेल्या वारकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे प्रशासनाने नमते घेत ३० वारकऱ्यांना पालखीसोबत पंढरपूरमध्ये चालत जाण्यास परवानगी दिली. त्यामुळे सर्व आता पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. आषाढी यात्रेसाठी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करून एसटी बसने आलेल्या वारकऱ्यांनी वाखरी येथे आल्यानंतर मात्र आक्रमक भूमिका घेतली आणि पायी चालत सर्व ४० वारकऱ्यांसह ‘पंढरीत जाऊ, अन्यथा इथेच थांबू’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासन हवालदिल झाले होते.
यापूर्वी शासनाने वाखरी ते विसावा इथपर्यंत प्रत्येक पालखीसोबत ४० वारकरी आणि विसावा येथून पंढरपूरपर्यंत प्रत्येक पालखीसोबत २ वारकऱ्यांना परवानगी दिली होती. मात्र, वारकऱ्यांनी हा प्रस्ताव नाकारून जाऊ तर सर्व ४० नाही तर नाही अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी वारकऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारकरी ठाम होते.
शेवटी वाखरी ते इसबावी-विसावा एसटी बसमधून आणि तेथून पंढरपूरपर्यंत ३० वारकरी प्रत्येक पालखीसोबत पायी जाण्याचा तोडगा प्रशासनाने मान्य केला आणि वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत पालख्या पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
फोटॊ ::::::::::::::::::::
वारकरी व प्रशासनाच्या बैठकीत बोलताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे.