सोलापूर : अॅड. राजेश कांबळे खून प्रकरणातील संशयित आरोपी अॅड. सुरेश चव्हाण हा ‘माझा खुनाशी संबंध नाही’ या जबाबावर ठाम आहे. मात्र बंटी खरटमल याने हा खून सुरेश चव्हाण याच्या सांगण्यावरूनच केला असल्याचे सांगत आहे. दोघेही आता न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, पत्नीच्या विनंतीवरुन बंटीच्या घराचे सील पोलिसांनी काढले.
अॅड. राजेश कांबळे यांच्या खुनातील आरोपी बंटी खरटमल याने अटक केल्यानंतर हा खून अॅड. सुरेश चव्हाण याच्या सांगण्यावरून केला असल्याचे सांगितले आहे. बंटी खरटमल याच्या जबाबावरून अटकेत असलेला संशयित आरोपी सुरेश चव्हाण याने खुनाशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. बंटी खरटमल याला पहिल्यांदा ८ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. बंटी खरटमल याने कोठडीत असताना खुनाची संपूर्ण माहिती अॅड. सुरेश चव्हाण याला आहे. दोन महिन्यांपासून खुनाचे नियोजन केले जात होते. अॅड. राजेश कांबळे यांना चहातून पाजण्यात आलेल्या झोपेच्या गोळ्या या सुरेश चव्हाण यानेच दिल्या होत्या. तुकडे करण्यासाठी सत्तूर व कोयता ही हत्यारेही चव्हाण यानेच दिली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुरेश चव्हाण हा चारचाकी कार घेऊन येणार होता असे सांगितले आहे.
अॅड. राजेश कांबळे यांच्या अंगावरील साडेपाच तोळे सोन्यापैकी अर्धे सोने सुरेश चव्हाण यालाच दिल्याचेही सांगितले होते. बंटी खरटमल याच्याजवळ असलेले सोने हे त्याने श्रीनिवास येलदी या सराफाला विकल्याचे सांगितले. बंटीच्या जबाबावरून श्रीनिवास येलदी या सराफाला अटक करून पोलिसांनी सोने हस्तगत केले. अॅड. राजेश कांबळे यांच्या खिशातील २५ हजार रूपये बंटी याने काढून घेतले होते. बंटी याने २५ हजार रूपये ज्या माने नावाच्या व्यक्तीकडून उसने घेतले होते त्याला दिले होते. पोलिसांनी माने याला बोलावून बंटी याने दिलेले २५ हजार रूपये काढून घेतले. सुरेश चव्हाण याच्याकडे दिलेल्या सोन्याचा मात्र तपास लागू शकला नाही.
घर बांधण्यासाठी गेमची केली होती वाच्यता- बंटी खरटमल याचे घर विटामातीचे असून ते जुने झाले आहे. पांडुरंग वस्ती येथील त्याच्या घराजवळच्या एका मित्राने त्याला घर बांधून घेण्यास सांगितले होते. तेव्हा बंटी याने सध्या पैसे नाहीत, पण एक गेम आली आहे, लवकरच पैसे येतील आणि घर बांधेन असे सांगितले होते.