सोलापूर : शहरात वाढणाऱ्या धुळीमुळे अनेक सोलापूरकरांना श्वसन व फुफ्फुसाचा त्रास होतो. हवेतील सूक्ष्म धुलिकण (पार्टिक्युलेट मॅटर १०), अतिसूक्ष्म धुलिकण (पीएम २.५), कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन अशा घातक वायूंची मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात दोन ठिकाणी प्रदूषण मापक यंत्र बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले यांनी लोकमत शी बोलताना दिली.
सध्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय(अक्कलकोटरोड, एमआयडीसी) व वोरोनोको प्रशाला ( रंगभवन) येथे दोन यंत्र सुरू आहेत. यात आता वाढ होणार असून, देगावरोड व रूपा भवानी मंदिर परिसर या ठिकाणी आणखी दोन प्रदूषण मापक यंत्रणा कार्यान्वित होणार आहेत. नव्या यंत्राचे वैशिष्ट म्हणजे यात अतिसूक्ष्म धुलीकणाचे (पीएम २.५) प्रमाण तपासणे शक्य आहे. सोलापूर शहरासोबतच बार्शी शहरात तीन ठिकाणी, तर पंढरपूर शहरात एका ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या सहकार्याने धुलीकरणावर संशोधन होईल.
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सीएएमक्यूएमएस
सात रस्ता येथे असणाऱ्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात कंटिन्यूअस एंबिएंट एयर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टम (सीएएमक्यूएमएस) बसविण्यात येणार आहे. या नव्या तंत्राच्या माध्यमातून पीएम २.५, पीएम १०, सल्फर डायऑक्साइड, ऑक्साइड ऑफ नाइट्रोजन, कार्बन मोनोक्साइड, ओजोन, अमोनियासहित इतर वायूंच्या प्रमाणाची माहिती मिळणार आहे. प्रत्येक मिनिटांची स्थिती तेथील डिसप्लेवर पाहता येईल.
--------------
शहरात नव्याने मॅन्युअलपद्धतीचे दोन प्रदूषण मापक यंत्र बसविण्यात बसविण्यात येणार आहे. याची प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. यासोबतच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सीएएमक्यूएमएस यंत्रणा बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- प्रशांत भोसले, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सोलापूर
------------------
शहराचे हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी या नव्या यंत्रणेचा उपयोग होईल. महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पुढील तपासणी व अॅनालिसीस करणार आहोत. तसेच एखाद्या विशिष्ट ऋतूत किती प्रदूषण असते हेही तपासले जाईल.
- डॉ. विनायक पत्की, विभागप्रमुख, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय