मोहोळ : तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आनुषंगाने नुकतेच प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले असून, अनेक प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवकांचे आरक्षण बदलल्याने अनेक नगरसेवकांचा भ्रमनिरास झाला आहे. आपल्याला आता कोणत्या वॉर्डात संधी मिळेल यासाठी अनेकांची पळापळ सुरू झाली आहे.
गत पंचवार्षिक निवडणुकीत थोडक्या मताने पराभव झालेल्या उमेदवारांनी आता कोणत्या पार्टीतून उभारल्यानंतर आपल्याला पुन्हा संधी मिळेल यासाठी धावपळ सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला शह देण्यासाठी शिवसेना, भाजपच्या बैठका झाल्या आहेत. दुसरीकडे सर्वच समविचारी मित्रपक्षांना बरोबर घेऊन एक आघाडी तयार करून प्रस्तापिताना शह देण्यासाठीही गुप्त बैठका सुरू आहेत.
पुढे जाऊन भाजपचा एक नगरसेवक व शिवसेनेचा एक नगरसेवक अशा दोघानी राष्टवादीला पाठिंबा देत राष्टवादीची संख्या ११वर नेली होती.
मागील पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सर्वच नगरसेवकांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषदेला निधी मिळाल्याने काही प्रभाग वगळता बहुतांश प्रभागांमध्ये विकासकामे झालेली आहेत. याच विकासकामाच्या जोरावर आम्हीच पुन्हा निवडून येऊ, असा आत्मविश्वास अनेक नगरसेवकांना होता. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने अनेकांना आता आपला वॉर्ड इतरत्र शोधण्याची पाळी आली आहे.
दुसरीकडे गत निवडणुकीत सर्वाधिक जागा असताना पाच वर्षे सत्तेच्या बाहेर राहावे लागलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तर आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस योग्य उमेदवाराच्या शोधात आहे. शिवसेना व राष्ट्रवादीला रोखण्यासाठी शहरातील सर्व समविचारी पक्ष व आघाड्यांना बरोबर घेऊन आघाडीच्या माध्यमातून नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी ही अनेकांच्या बैठका सुरू आहेत. गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाला दोन व काँग्रेसला दोन जागा मिळाल्याने आता भाजप व काँग्रेसनेही कंबर कसली असून, आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार? असा पवित्रा दोन्ही पक्षांनी घेतला आहे.
सर्वच पक्षांची व आघाड्यांची पळापळ पाहता प्रभागनिहाय पडलेल्या आरक्षणानुसार कोणत्या वॉर्डात योग्य उमेदवार कोणत्या पक्षाकडून दिला जाणार यावरच त्या त्या पक्षाचे व पार्टीचे भवितव्य ठरणार आहे .
-----
चौकात, टपऱ्यांवर रंगू लागली चर्चा
सध्या शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या चर्चा चौकाचौकांत व पान टपरीवरही रंगू लागली आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेच्या सहा जागा आल्या होत्या. काँग्रेस दोन जागा आणि भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या, तर रमेश बारसकर यांच्या विकास आघाडीला तीन जागा मिळाल्या होत्या. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. याचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश बारसकर आघाडीच्या तीन, काँग्रेसच्या दोन व राष्टवादीच्या चार अशा पद्धतीने नऊ जागेच्या जोरावर बहुमत सिद्ध करीत बारसकर यांना नगराध्यक्ष पदाचा मान दिला होता.
----