मोहोळ नगरपरिषदेचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत १० फेब्रुवारी रोजी नगरपरिषद कार्यालयात प्रांताधिकारी, तहसीलदार व सर्व पदाधिकाऱ्यांसमोर काढण्यात आले. या आरक्षणानंतर माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी वार्डनिहाय आरक्षण काढताना चुकीच्या पद्धतीने आरक्षण काढले असल्याची हरकत घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली आहे. याच दरम्यान नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा वंदना सुरवसे यांनी काढण्यात आलेली आरक्षण सोडत ही पारदर्शक असून, सर्व जनतेसमोर काढली असताना काही राजकीय मंडळी आपल्या स्वार्थासाठी राजकीय वजन वापरून आरक्षण सोडतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी १० फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय काढलेले आरक्षण हे योग्य असून, त्यात कोणताही बदल करू नये, अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, अशा स्वरूपाचे पत्र यांनी काढले आहे.
राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांनी आरक्षण सोडतीबाबत घेतलेल्या या भूमिकेमुळे आता नेमके काय होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.