सोलापूर : मानधनात वाढ, वसतिगृहांची स्थिती आदी प्रलंबित मागण्यांसाठी मार्ड अर्थात मध्यवर्ती निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. यानुसार गुरूवार सायंकाळी ५ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू झाले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता जवळपास सगळ्याच सेवांवर याचा परिणाम होईल असे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, मध्यवर्ती संघटनेकडून काही दिवसापुर्वीच आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाकडून पुढील दहा दिवसात सगळ्या मागण्यांवर सकारात्मक विचार होईल असे अश्वासन देण्यात आले होते. पण अद्याप पर्यंत त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गुरूवारी सकाळी ओपीडी नियमित सुरू झाली पण शुक्रवारी ही संप सुरू राहिल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होईल असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.