सोलापूर : जुने विडी घरकूल परिसरातील नागरिक शाडूच्या गणेशमूर्तीची घरी प्रतिष्ठापना करण्याकरिता उत्सुक आहेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची घरात प्रतिष्ठापना करून घरातच विसर्जन करण्याचा त्यांचा संकल्प आहे. याकरिता विडी घरकूल मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेतला आहे.
मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही यासाठी विशेष कार्यक्रम राबविणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. लोकमतने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असून समाजाभिमुख आहे. ‘शाडूच्या गणेशमूर्ती घरोघरी’ या उपक्रमाला आमचा पाठिंबा असून विडी घरकूल परिसरातील श्रमिकांच्या घरी इको फ्रेंडली गणेशमूर्ती बसविण्याकरिता आम्ही लोकमतच्या माध्यमातून प्रबोधन करू, असे मध्यवर्ती मंडळाचे प्रेसिडेंट वासुदेव यलदंडी यांनी सांगितले.
नीलमनगर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाकडून देखील यंदा समाजाभिमुख गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर यासोबतच गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नीलमनगर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आनंद मुसळे यांनी दिली.
लोकमतचा उपक्रम स्तुत्य असून, नीलमनगर परिसरात आम्ही जास्तीत जास्त मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या घरी शाडूच्या गणेशमूर्ती बसविण्याकरिता प्रोत्साहन देणार आहोत. मी स्वत: माझ्या घरी शाडूची गणेशमूर्ती बसविणार आहे, असे आनंद मुसळे यांनी सांगितले.
आमचं मध्यवर्ती मंडळ यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहे. विडी घरकूल परिसरातील सर्व मंडळांच्या पदाधिकाºयांना समाजाभिमुख गणेशोत्सव साजरा करण्याचा सल्ला दिला आहे. आणखी एक बैठकही घेणार आहोत. या बैठकीत समाजाभिमुख कार्यक्रम राबविण्याचा सल्लाही आम्ही देणार आहोत. विशेष म्हणजे कार्यकर्ते व नागरिक यंदा शाडूच्या गणेशमूर्ती बसविण्याकरिता उत्सुक आहेत. लोकमतने सुरू केलेला पाठपुरावा खूप स्तुत्य आहे. समाजाभिमुख आहे.- वासुदेव यलदंडीप्रेसिडेंट- विडी घरकूल मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
मध्यवर्ती मंडळाची बैठक झाली. सर्व मंडळांशी संवाद साधण्यात आला. सर्वानुमते यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार आहोत. ना मिरवणूक, ना स्टेज, ना उत्सव खर्च असा यंदाचा गणेशोत्सव असणार आहे. नीलमनगर मध्यवर्ती मंडळाकडून लोकमतच्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती उपक्रमाला पाठिंबा आहे. त्याकरिता आम्ही जास्तीत जास्त नागरिकांना प्रबोधन करणार आहोत.- आनंद मुसळे, अध्यक्ष - नीलमनगर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ