मंगळवेढा : शाळांची गुणवत्ता व प्रशासकीय कामकाज कायदेशीररित्या न करता व प्रगतीस बाधा आणून नगरपालिका सभागृहाची दिशाभूल करून शैक्षणिक क्षेत्रास नुकसान करण्याच्या हेतूने काम करणाऱ्या शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शाहू सतपाल यांची बदली करण्याचा ठराव मंगळवेढा नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेने मंजूर केला.
मंगळवेढा नगरपालिकेच्यावतीने शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आठ ठिकाणी शाळा चालविल्या जात आहेत. दोन वर्षांपूर्वी येथे नगरपालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी सतपाल यांनी नगरपालिका शाळा दोनमधील पाचवीचा वर्ग अधिकाराचा गैरवापर करत बंद केला. त्यावरून पालक व विद्यार्थी यांनी नगरपरिषदेकडे वर्ग सुरू करण्याची वारंवार मागणी केली. याबाबत नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन अधिकाऱ्यांकडे वर्ग सुरू करण्याबाबत सांगूनही त्यांना चुकीची माहिती देत ते सुरू करता येत नसल्याचे सांगितले जात होते; परंतु अधिकाराचा गैर वापर करून वर्ग सुरू करण्यासंदर्भात सतपाल यांनी टाळाटाळ केल्याने पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत नपा शाळा क्रमांक दोनचा वर्ग सुरू करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला. त्यावेळी प्रशासन अधिकारी यांनी काही खासगी शाळांच्या दबावाखाली नगरपालिकेची शाळा बंद करून नगरपालिकेच्या हिताविरोधी निर्णय घेतल्याने नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांनी हा वर्ग चालू करावा व संबंधित अधिकाऱ्यावर बदलीची कारवाई करण्याची सूचना मांडली. शाळा सुरू करण्याचा व बंद करण्याचा अधिकार सर्वस्व मुख्याधिकाऱ्यांना असून त्यांच्या अधिकाराचा सतपाल यांनी गैरवापर करून सभागृहाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आणून दिले. उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी अनुमोदन दिले. सतपाल यांची बदली करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला
---
अधिकाराचा गैरवापर करुन सभागृहाची दिशाभूल केल्याने प्रशासन अधिकारी शाहू सतपाल यांच्या बदलीचा ठराव केला आहे. तो ठराव शासनाकडे पाठविला जाणार आहे.
- अरुणा माळी
नगराध्यक्षा