पंढरपूर : धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढला नाही. तर यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक यासह राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या बंगल्यासमोर ढोल बजाओ आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटात आ. गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गाच्या दाखल्यासाठी ढोल बजाव सरकार जगाओ आंदोलन केले. यावेळी धनगर समाजातील बांधव पारंपारिक वेशात पिवळे ध्वज, गजी ढोल घेऊन एकवटलाचे चित्र पहावयास मिळाले.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगड आणि धनगर हा मागील अनेक वषार्पासून संभ्रम आहे. राज्यामध्ये धनगड समाज अस्तित्वात नाही, जो आहे तो फक्त धनगर समाज आहे. याबाबत मागील सरकारने याबाबतची संभ्रम दूर केला आहे. यामुळे राज्य सरकारने धनगर समाजाला एसटी चा दाखला देणे सुरू करावे. त्याचबरोबर राज्य सरकारने यासंदर्भात अध्यादेश काढावा. तसे न झाल्यास यापुढे सर्व सत्ताधारी नेत्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करणार असल्याचे आ. गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.