सोलापूर : गणेशोत्सव उत्सव मंडळाचा असो किंवा घरगुती कोणालाही सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही. जिथे प्रतिष्ठापना कराल तेथेच ‘श्रीं’ चे विसर्जन करा. दरम्यान, डीजे,बँड पथक, नाशिक ढोल, ढोली ताशा, झांज, लेझीम असे पारंपरिक वाद्य वाजवता येणार नाही, असा आदेश जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आला आहे.
मध्यवर्ती मंडळे, गणेश मंडळे, मूर्तिकार यांच्याशी विचारविनिमय करून शासन नियमाप्रमाणे गणेश उत्सवाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी श्रीगणेशाची मूर्ती शक्यतो आॅनलाईन बुक करावी अथवा गोडावून, दुकान, कारखाना येथून दोन ते तीन दिवस अगोदर घेऊन जावी. सार्वजनिक ठिकाणी मंडप घालून किंवा रस्त्यावर गणेश मूर्तीची विक्री करता येणार नाही. घरगुती गणपती दोन फूट तर सार्वजनिक गणेश मूर्ती चार फूट किंवा त्याहीपेक्षा कमी असावी. सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेस कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. ज्यांनी परवानगी काढली असेल त्यांना २०२१ मध्ये परिस्थिती पाहून परवानगी दिली जाईल. उत्सवाच्या अनुषंगाने कोणालाही होर्डिंग, बॅनर, पोस्टर लावण्यास परवानगी राहणार नाही. मंडळाला सार्वजनिक ठिकाणी, चौकात, रस्त्यावर मंडप घालून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करता येणार नाही.
जिथे श्रीगणेश मंदिरे आहेत किंवा कायमस्वरूपी मूर्ती ठेवलेली आहे तेथे प्रतिष्ठापना करता येईल; मात्र त्या ठिकाणी स्टेज मंडप उभारता येणार नाही. घरगुती किंवा पक्के बांधकाम असलेल्या ठिकाणी गणेश मूर्ती स्थापन करता येईल. असे परिपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. हे परिपत्रक ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शहरासाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे.
गणेश उत्सवात निर्बंध पाळागेल्या चार ते साडेचार महिन्यांपासून कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुरू आहे. लॉकडाऊन, निर्बंध अशा विविध मार्गाने कोरोनाचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून, त्याला यशही येत आहे. येणारा गणेशोत्सव व इतर सण कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध पाळून साजरे करणे आवश्यक आहे.असे आहेत नियम...
- - आरतीच्या वेळी दहा किंवा दहापेक्षा कमी लोकांची उपस्थिती रहावी
- - श्रीगणेशाच्या आरतीसाठी सकाळी किंवा सायंकाळी आरती व पूजेसाठी दहा किंवा दहापेक्षा कमी लोकांनी उपस्थित रहावे. दरम्यान, सुरक्षित अंतर ठेवून गर्दी टाळावी.
- - आरतीसाठी काही पदाधिकाºयांना सकाळी तर काही पदाधिकाºयांना संध्याकाळच्या वेळेत बोलवावे.
- - आरतीसाठी सकाळी सात ते दहा तर सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत बेस विरहित (२३ फुटाचे) दोन स्पीकरचे बॉक्स वापरता येतील.
- - शहरात संबंधित सहायक पोलीस आयुक्त तर ग्रामीण भागात उपविभागीय पोलीस अधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
- - श्रींचे आगमन, स्थापना किंवा विसर्जन इत्यादीसाठीच्या कोणत्याही मिरवणुका काढता येणार नाहीत.