या पोटनिवडणुकीच्या निकालाचा परिणाम राज्यातील सरकारवर होणार नसला तरी जिल्ह्याचे नेतृत्व ठरवणारा नक्कीच असणार आहे. या निवडणुकीनिमित्त आ. संजय शिंदे यांनी अनेकवेळा मोहिते-पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मोहिते-पाटलांनी मात्र थेट उत्तर देणे टाळत ही जागा जिंकून जिल्ह्यातील विरोधकांसह बारामतीकरांना कसा शह देता येईल, यावरच जास्त लक्ष असल्याचे दिसले. जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या सोलापूर जिल्हा बँकेसह विधानपरिषद व इतर महत्त्वाच्या विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होत आहेत. त्या दृष्टीने या निकालाकडे पाहिले जात आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत झाली असली तरी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे चिरंजीव आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याविरोधात आ. संजय शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार अशीच नेतृत्वाची लढाई दिसून आली.
ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा असताना आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन पोटनिवडणुकीसाठी दोन प्रमुख दावेदार असलेल्या आ. प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आणि राष्ट्रवादीसमोर भाजपाने तगडे आव्हान उभे केले. त्यानंतर प्रचाराची रणनीती आखण्यापासून जातीय समीकरणे जुळवून पवार कुटुंबीय व आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा पाढा मतदारांसमोर आणण्याची रणनीतीही त्यांनीच आखली. भाजपाची ही रणनीती राष्ट्रवादीच्या लक्षात येताच मोहिते-पाटलांचे कट्टर विरोधक व अजित पवार यांचे विश्वासू आ. संजय शिंदे यांच्या हातात निवडणुकीची सूत्रे दिली.
प्रारंभी संजय शिंदे यांची आ. परिचारक यांच्याशी असलेली मैत्री यामुळे ते पूर्ण ताकदीने यामध्ये उतरतील का? अशी शंका व्यक्त केली जात होती.
मात्र प्रचारादरम्यान आ. संजय शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्यांना जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी ज्यांना दिली त्यांनी साखर कारखाने, जिल्हा बँकेचे वाटोळे केले, आशा शेलक्या शब्दात मोहिते-पाटलांवर टीका केली. शिवाय ही निवडणूक बिनविरोध करण्याची परिचारकांची तयारी असताना केवळ मोहिते-पाटलांच्या हट्टामुळे निवडणूक लादल्याचा आरोप शिंदे यांनी प्रचारसभांमध्ये केला.
---
निकाल आगामी निवडणुकांसाठी दिशा देणारा
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे एकमेकांच्या निशाणावर आलेच नाहीत. आगामी काळात जिल्हा बँक, विधानपरिषद, जिल्हा दूध संघ, झेडपी, पंचायत समित्यांसह सहकारी संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यासाठी हा निकाल दोन्ही पक्षांसाठी दिशा देणारा ठरणार आहे.
-----