सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांना जाहीर झाल्याची घोषणा प्रभारी कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी गुरुवारी केली. मूळचे सोलापूरचे असलेले निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मंगळवारी, एक ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा १९ वा वर्धापन दिन समारंभ नियोजित आहे. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते होईल. त्यानंतर सकाळी नऊ वाजता सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभास मुंबई विद्यापीठ, मुंबईचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.