देणाºयाची दानत कितीही मोठी असली तरी घेणाºयांनी उपकाराची जाणीव ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे असते. देण्याची पद्धत कोणतीही असो. मदत म्हणून वा मुदत म्हणून, उसनवारी वा नापरतावा! पण, आपण घेतो याची जाणीव सदैव ठेवली पाहिजे. सव्याज व्यवहार काही स्तरापर्यंत ठिक आहे, परंतु देणाºयांनी माणूसपण जागृत ठेवून व्यवहार पूर्ण करणे आवश्यक असते. सव्याज व्यवहारातून होणाºया नकारात्मक घटना देणाºयाच्या मानसिकतेमुळेच होतात हेही विसरून चालणार नाही.
या बाबींची नोंद घेऊन देणाºयांनी घेणाºयांच्या घरावर नांगर फिरेपर्यंत मजल मारू नये म्हणजे घेणारा देण्यासाठी काही तरी तजवीज करून ठेवू शकेल, त्याच्या आयुष्याचे समीकरण त्याला व्यवस्थित हाताळता येईल. सर्वच व्यवहार प्रामाणिकपणे झाल्यास वाद-विवाद, भांडण-तंटे होणारच नाहीत. आयुष्य सुंदर आहे, परंतु योग्य समज असणे आवश्यक आहे. देणाºयापेक्षा परत करणाºयाची भावना शुद्ध असली की कोणत्याही प्रकारचा गैरसमज वा वाद होणार नाहीत, परंतु माणसामाणसांतील वाढत चाललेल्या दरीमुळे हे तुर्तास तरी शक्य नाही असे वाटते. तरीही आपण आशावाद जागृत ठेवायला काय हरकत आहे.
कधीकाळी केलेली आणि स्मरणात राहिलेली उसनवारी लक्षात ठेवून ती परत करण्याचा असाच एक सुखद प्रकार फेसबुकवर वाचला आणि माणसात अजूनतरी माणूसपण असल्याची खात्री पटली. ‘एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून देशात वादग्रस्त वातावरण निर्माण करणाºया ठकांची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी तीस वर्षांपूर्वी घेतलेल्या २०० रुपयांची उधारी फेडायला भारतात आणि तेही आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये येतो आणि काशिनाथ गवळी यांच्या घरी जाऊन पैशांची परतफेड तर करतोच शिवाय आपल्या देशामुळे, आपल्या महाराष्ट्रामुळे आणि काशिनाथ काकांसारख्या कुटुंबवत्सल माणसांमुळेच मी घडलो असे सांगून आपल्या देशाची चांगली प्रतिमा जगासमोर आणतो. ही किती अभिमानाने ऊर फुलून येणारी घटना वाटते.
परवा एका स्टेशनरी दुकानासमोर थांबलो होतो तेव्हा साधारण एक दहा वर्षांचा लहान मुलगा आपल्या वडिलांना वारंवार विनवत होता की, ‘बाबा द्या हो पैसे काकांना..’ मग आपसूकच माझं कुतूहल जागा झाल्याने मी त्यांच्या संभाषणाकडे लक्ष केंद्रित केले. दोन-तीन दिवसांपूर्वी त्या मुलाने त्याच दुकानातून पेन्सिल, रबर, शार्पनर या वस्तू घेतल्या होत्या. परंतु त्याच्याकडे पैसे नसल्याने दुकानदाराला विनवणी करून ‘काका आज माझ्याकडे पैसे नाहीत मला पेन्सिल, रबर, शार्पनर उधार द्या ना! मी उद्या नक्की पैसे आणून देईन, या वस्तू नाही नेल्या तर टीचर रागावतील हो मला!’ दुकान शाळेजवळ असल्याने, शिवाय तो विनवणी करत असल्याने दुकानदाराला दया आली व त्याने वरील वस्तू दिल्या. आणि आज त्याचे वडील नेमकं त्याच दुकानातून काही वस्तू घेऊन बाहेर पडले परंतु मुलाची दहा रूपयांची उधारी काही परत करत नव्हते म्हणून तो मुलगा वारंवार वडिलांना बजावत होता की, ‘बाबा दुकानदार काकांचे दहा रुपये द्या हो..’ वडील म्हणाले, ‘अरे त्यांचं लक्ष नाही जाऊदे..’ पण त्या मुलाला हे काही पटतच नव्हतं.
माझ्याप्रमाणे दुकानदारही दोघांचे संवाद बारकाईने ऐकत होता. मुलगा काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्या पालकाचा नाईलाज झाला आणि ते दोघेही मागे वळून दुकानात गेले. वडिलांकडून दहा रुपये घेऊन तो मुलगा दुकानदाराला परत करताना म्हणाला, ‘काका कालची माझी उधारी घ्या हं! पेन्सिल, रबर व शार्पनर घेतलं होतं तुमच्याकडून..’ दुकानदार पैसे घेत त्या मुलाला धन्यवाद म्हणायला विसरला नाही. मग तो त्या पालकाकडे वळला, पडलेला चेहरा पाहत म्हटला, ‘उसनवारी परत करत चला...म्हणजे देणाºयाला परत काही देताना गैरसमज होणार नाही.’ होकारार्थी मान डोलावत दोघेही मायबाप निघून गेले. दुकानदाराचे ते वाक्य खरंच खूप मार्मिक वाटले, ‘आपण घेतो, परंतु देताना त्याच भावनेने परत देतोच असं नाही.’ हे कुठंतरी थांबलं पाहिजे.- आनंद घोडके(लेखक जि.प. शाळेत शिक्षक आहेत.)