पंढरपूर:काला करिती संतजनसवे त्याच्या नारायणवाटी अपुल्या निजहस्तेभाग्याचा तो पावे तेथे गोपाळपुरात गोपाळांनी केलेला काला आनंदाने गोड करीत, आषाढी वारी पूर्ण करीत विविध संतसज्जनांनी आज पंढरीच्या पांडुरंगाचा जड अंत:करणाने निरोप घेतला. ‘आषाढी, कार्तिकी विसरू नका मज’ अशी विनवणी करणाऱ्या पांडुरंगाची आषाढी वारी केल्यानंतर गोपाळपूरला भेट दिल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्याच क्षणासाठी आज गोपाळांच्या काल्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दही-लाह्या असा प्रसाद एकमेकांना भरवत वारकऱ्यांनी काल्याचा आनंद लुटला.आज सकाळी आठ वाजता माऊलींची पालखी गोपाळकाल्यासाठी निघाली. कार्यक्रमस्थळी मंदिर समितीच्या वतीने खास ओटे बांधले होते. त्यावर शामियाने उभारण्यात आले होते. त्यावर पालखी स्थानापन्न करण्यात आली. काल्याचे अभंग, आरती आणि प्रसाद वाटप केल्यानंतर श्रीकृष्णाची व जनाबाईची भेट घेऊन पादुका पांडुरंगाच्या भेटीसाठी नेण्यात आल्या आणि परत नाथ चौकातील ज्ञानेश्वर मंदिरात पालखी आली. दुपारी चार वाजता पालखीने पंढरपूर सोडले असून, पालखीला निरोप देण्यासाठी पंढरपुरातील बहुसंख्य महाराज मंडळी उपस्थित होती. संत निवृत्तीनाथांची पालखी सकाळी सात वाजताच मोहन महाराज बेलापूरकर व चोपदार गोरख दगडे यांनी नेली होती. काल्याचा सोहळा आटोपून भोजनानंतर पालखी परतीला लागली.--------------------------------------भाऊक झाला निरोपसर्वांत शेवटी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपुरातून बाहेर पडली. त्यावेळी माऊलींना निरोप देण्यासाठी पंढरपुरातील बहुसंख्य महाराज मंडळी आली होती. निरोप देताना गेले काही दिवस माऊलींसोबत असलेल्या वारकऱ्यांचा कंठ दाटून आला होता; तर काहींनी डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
गोपाळकाला करून पालख्या परतीला
By admin | Published: July 13, 2014 1:21 AM