उत्तर सोलापूर तालुक्यात ग्रामसेवकांची ३०, तर ग्रामविकास अधिकाऱ्यांची ५ पदे मंजूर आहेत. ३० ग्रामसेवक व ४ ग्रामविकास अधिकारी कार्यरत होते. जिल्हाअंर्तगत बदलीने सुजाता व्हनकडे, महेश लंगोटे व संतोष वाघ इतर तालुक्यात बदलून गेले. त्यांच्या बदलीने इतर तालुक्यातील कोणीही उत्तर तालुक्यात आले नाही.
तालुकाअंर्तगत बदल्यात तिऱ्हेचे गणेश मोरे खेड, खेडचे रामचंद्र कांबळे रानमसले, तर पाथरीच्या सरवदे यांची वांगी येथे बदली झाली. त्यामुळे आता पाथरी, तिऱ्हे व कौठाळी गावाला ग्रामसेवकाचे पद रिक्त आहे.
ग्रामसेवकांच्या बदल्यात प्रशासनाने घोळ घालत गावे रिक्त ठेवली असताना ग्रामविकास अधिकाऱ्यांबाबतही असाच प्रकार सुरू आहे. तालुक्यातील वडाळा, नान्नज, मार्डी, बीबीदारफळ व कोंडी या गावांसाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ कोंडी गावचे पद रिक्त दाखविले. त्यामुळे एका ग्रामसेवकाची पदोन्नती द्यायला हवी होती. प्रशासनाने नंदकुमार पाटील व अनिल शिंदे या दोन ग्रामसेवकांना पदोन्नती दिली. दोघांना पदोन्नती दिली; मात्र त्यांना गावे दिलेली नाहीत. एक मे रोजी पदोन्नतीचे आदेश काढले; मात्र त्यांना आजही गावेच दिली नाहीत. या दोघांना गावे दिली तर पुन्हा ग्रामसेवकांची दोन गावे रिक्त होणार आहेत.
तक्रारीच तक्रारी
परवा होनसळच्या ग्रामसेविकेविरोधात सभापतीकडे तक्रारी घेऊन सरपंच व सदस्य आले होते. नंतर ते बळीरामकाका साठे यांना घेऊन सीईओंना भेटले. पाकणीच्या ग्रामसेविकेच्या कामकाजाबाबतही सरपंचाच्या तक्रारी आहेत. अशाच पद्धतीने कवठे, बेलाटी, तळेहिप्परगा व नान्नजच्या ग्रामसेवकांच्या तक्रारी आहेत.
उत्तर तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्यांचे नव्याने एक पद मंजूर असल्याचे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने कळविले आहे. मात्र, गावाचे नावच दिले नाही. दोन वेळा पत्र दिले, मात्र ग्रामपंचायत विभाग दखल घेत नाही.
- रजनी भडकुंबे,
सभापती, पंचायत समिती