करमाळा : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, राज्य सरकारने घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय आणि कडक निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवा सोडून अन्य व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा निर्णय रद्द करून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा जेऊर व्यापारी संघटनेने दिला आहे.
गेल्यावर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर सामान्य व्यापारी कसेबसे सावरत असतानाच सरकारने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केले आहे, यात अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्वप्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. परंतु, या आदेशामुळे अशा व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या संदर्भात बुधवारी तहसीलदारांना भेटून जेऊर व्यापारी संघटनेने निवेदन दिले. लॉकडाऊन मागे घ्या किंवा सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी बिपीन सोनी, नितीनकुमार मंडलेचा, सागर भगत, रणजित कांबळे, गणेश काळे, आनंद मोरे, सम्येक दोशी, संदीप रुपनवर, विशाल तकीक, पप्पू पांडेकर, बाळासाहेब गरड, पवन कोठारी, प्रवीण शिरस्कर, मंगेश कर्णवर, गणेश आम्रुळे, सचिन सलगुडे, ओंकार चुंबळकर, स्वप्नील कांबळे, अक्षय महाडिक, अरिफ शेख, देविदास अतकरे यांच्यासह जेऊरमधील असंख्य व्यापारी उपस्थित होते.
----