सोलापूर : अनेक महिन्यांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सोलापूर दौºयावर आले आहेत. परंतु, भाजपचे दोन मंत्री वगळता इतर लोकप्रतिनिधींना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले आहे. याबद्दल ज्येष्ठ आमदारांनी ‘लोकमत’कडे नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौºयावर येत असल्याची चर्चा होती. परंतु, हा दौरा दुष्काळासाठी नव्हे तर जिल्हा आणि महानगरपालिकेकडील विकासकामांसाठी आयोजित करण्यात आल्याचे मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते़ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजल्यापासून जिल्हा आढावा बैठक सुरू झाली.
या बैठकीत पंतप्रधान आवास योजनेसह विविध कामांवर चर्चा होईल. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी आढावा बैठक सुरू आहे़ दुपारी १२ वा. महानगरपालिकेकडील विकासकामांबाबत तर दुपारी १ वा. कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक होणार होणार आहे़ या बैठकीला भाजपचे दोन मंत्री, महापौरांना बोलावण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर आमदारांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.
उड्डाण पुलासाठी हवे अनुदान महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे स्मार्ट सिटीच्या कार्यशाळेसाठी दक्षिण कोरियाच्या दौºयावर आहेत. स्मार्ट सिटीसह इतर सर्व कामे आयुक्त हाताळत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत दोन उड्डाण पुलांचे प्रस्ताव, ड्रेनेजलाईन, दुहेरी पाईनलाईन अशा महत्त्वाच्या विषयांवर अधिकाºयांना सादरीकरण करायचे आहे. ही माहिती संकलित करण्यासाठी अपर आयुक्तांसह इतर अधिकाºयांची धावपळ सुरू होती. शहरात जडवाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. उड्डाण पुलाच्या भूसंपादनासाठी महापालिकेला विशेष अनुदानाची गरज आहे. हा विषय नगरविकास खात्याकडे प्रलंबित आहे. आढावा बैठकीत याबद्दल निर्णय अपेक्षित आहे.
विशेष अनुदानाची मागणी : महापौर- शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दिवाळीपूर्वी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे गरजेचे आहे. बुधवारी होणाºया बैठकीला आयुक्त नाहीत. परंतु, त्यांच्या अनुपस्थितीत मी पाणीपुरवठ्यासह महापालिकेच्या विविध प्रश्नांवर बाजू मांडणार आहे. नगरसेवकांना विकास निधी मिळावा, यासाठी विशेष अनुदान मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. आढावा बैठकीत या विषयावरही चर्चा झाली असती. अधिकाºयांकडून माहिती घेण्यापेक्षा लोकप्रतिनिधींकडून माहिती घेणं चांगलं झालं असतं. मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावणं गरजेचं होतं.- आमदार गणपतराव देशमुख
मुख्यमंत्र्यांच्या दौºयाबद्दल आम्हाला कल्पना नाही. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींशी चर्चा होणं गरजेचं आहे. आढावा बैठकीला बोलावले असते तर लोकांच्या समस्या सांगता आल्या असत्या. मुख्यमंत्र्यांनी बोलवायला हवे होते. - आमदार बबनराव शिंदे
जिल्ह्याच्या विकासाची आढावा बैठक असेल तर सर्व आमदार-खासदारांना बोलावणं गरजेचं आहे. जिल्हाधिकाºयांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी ही दुष्काळी बैठक नसून विकासकामांची आढावा बैठक आहे, असे सांगितले. मुंबईत मुख्यमंत्री एवढा वेळ देऊ शकणार नाहीत. - आमदार भारत भालके