सोलापूर - राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल ९९ .९५ टक्के लागला आहे. दरम्यान, पुणे विभागात सोलापूर जिल्हा अव्वल ठरला असून सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के इतका लागला आहे.
सोलापूर जिल्ह्यातून एकूण ६५ हजार १९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता, त्यातील ६५ हजार १९३ विद्यार्थ्यांचे गुण बोर्डाला पाठविण्यात आले होते. यातील ६५ हजार १७६ मुले उत्तीर्ण झाली आहेत.
नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदान करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी ऑनलाइन जाहीर होणारा निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.