बार्शी : रिक्षा व्यवसाय करणाऱ्याने घराचे कुलूप तोडण्याचा जाब विचारल्याने त्याच्या डोक्यात लाकडी दांडका व वीट घालून जखमी केले. तसेच रिक्षाचालकाला सोडवायला गेलेल्या पत्नीला व त्यांच्या मावशीलाही मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी चार महिलांसह आठ जणांविरूध्द बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी कचरू थोरात, बापू थोरात, बापू ढावारे, बापू थोरात यांच्यासह चार महिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित रिक्षाचालक हे सासरवाडीला गेले होते. ते परत येताच राजू थोरात व ओम कांबळे हे त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडताना दिसून आले. त्यांना पाहताच कुलूप तोडणाऱ्यांनी पळ काढला. रिक्षाचालकाने त्यांना जाब विचारला असता मारहाण करून जखमी केले. जखमींची पत्नी व मावशी या सोडविण्यास आल्या असता हल्लेखोरांपैकी दोघांनी महिलांशी लज्जास्पद वर्तन केले. अधिक तपास फाैजदार सस्ते करत आहेत.