सोलापूर : या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण महिना अखेरीस म्हणजेच येत्या गुरुवारी (ता.२६) सकाळी आठ ते अकरा या वेळेत ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ अर्थात ‘रिंग ऑफ फायर’ दिसणार आहे. देशाच्या दक्षिणेकडील राज्यात हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे तसेच ही एक निसर्ग व अंतराळाशी नाते जोडण्याची ही दुर्मिळ संधी असणार आहे, मात्र देशवासीयांसह सोलापूरकरांना हे सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेत अनुभवायला मिळणार आहे. यापूर्वी याचवर्षी ६ जानेवारी आणि २ जुलै २०१९ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण लागले होते, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
भारतात सूर्योदयानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण देशातील दक्षिण भाग कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये दिसेल. तर देशातील इतर भागात हे ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहणच्या रुपात दिसेल, असे खगोल शास्त्रज्ञांनी सांगितले. भारतीय वेळेनुसार खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी ८ वाजता दिसेल. तर कंकणाकृती सूर्यग्रहण सकाळी ९.०६ वाजता दिसेल. सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी संपेल. तर ग्रहणाची खंडग्रास अवस्था दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी संपेल. या सूर्यग्रहणामध्ये सूर्याचा ९३ टक्के भाग हा चंद्राने झाकला जाईल. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र आल्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचणार नाही याला सूर्यग्रहण म्हणतात. दरम्यान, यानंतर सूर्यग्रहण भारतात २१ जून २०२० रोजी दिसेल. ते एक कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. कंकणाकृती अवस्थेचे सूर्यग्रहण भारतातून जाईल. तर देशाच्या शेष भागात हे सूर्यग्रहण खंडग्रास रुपात दिसेल.
गुरुवार, २६ डिसेंबर रोजी ग्रहणमोक्षकालानंतर म्हणजे ११ नंतर स्नान करून मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे पूजन, उद्यापन करावे. गुरुवारचे वार व्रत असल्याने आणि सूर्योदयानंतर मार्गशीर्ष महिना असल्याने व्रताचे पूजन व उद्यापन २६ तारखेला गुरुवारी करता येते़
ग्रहण पाहताना घ्यावयाची काळजीकंकणाकृती व खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याकरिता तयार केलेले विशेष चष्मे किंवा काजळी लावलेली काळी काच किंवा सूर्याचे प्रखर किरण डोळ्यांपर्यंत पोहोचू नयेत याकरिता उपलब्ध साधनांचा वापर करूनच ग्रहण पाहावे. कोणत्याही कारणास्तव नुसत्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहू नये. ग्रहणाचे फोटो काढणाºयांनी विशिष्ट फिल्टरचा उपयोग करूनच फोटो काढावेत अन्यथा डोळ्यांना इजा पोहोचू शकते. या ग्रहणामध्ये कंकणाकृती अवस्था ३ सेकंदांपर्यंत दिसणार असल्याने त्या कालावधीत पूर्णवेळ डोळ्यांवर ग्रहण पाहण्याचा चष्मा लावूनच ठेवावा.
ग्रहण काळात हे करू नये...- हे ग्रहण दिवसाच्या पहिल्या प्रहारात असल्याने बुधवार, २५ डिसेंबरच्या सूर्यास्तापासून २६ डिसेंबर रोजी ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. बाल, वृध्द, आजारी अशा व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी रात्री १२ पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, नित्यकर्म, देवपूजा, श्राद्ध कर्मही करता येतात. वेधकाळात आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप इ. कर्मे करता येतात. ग्रहणपर्वकाळात म्हणजेच सकाळी ८ ते ११ या कालावधीत पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप इत्यादी कर्मे करू नयेत असे सांगितले जाते.