सोलापूर: जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढले असून, रुग्णांच्या उपचारासाठी शहर व ग्रामीण भागात १८ हजार ४९१ बेडची सोय केलेली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.
जिल्हयात १६ मार्चअखेर विविध ठिकाणी १ हजार ६८८ रुग्ण ॲडमिट होते. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामानाने कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. १६ हजार ८०३ बेड शिल्लक असले तरी शहरातील प्रमुख रुग्णालयात रुग्ण वाढले आहेत. कोरोना रुग्णांसाठी १८ हजार ४९१ बेडची उपलब्धता असली तरी रुग्णांच्या लक्षणानुसार त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घ्यावे लागतात. यामध्ये आयसीयू बेड ६०७ असून, ३२६ रुग्ण ॲडमिट आहेत. व्हेंटिलेटरची सुविधा असलेले २०९ बेड असून, ४९ रुग्ण ॲडमिट आहेत. ऑक्सिजनची सोय असलेले १ हजार १८१ बेड उपलब्ध असून, यावर १६१ रुग्ण ॲडमिट आहेत.
उपलब्ध बेडपैकी १३हजार ६६५ बेड ग्रामीण भागात तर ४ हजार ८३७ बेड सोलापूर महानगरपालिका हद्दीत आहेत. २८८ आयसीयू बेड ग्रामीण तर ३१९ शहरात आणि व्हेंटिलेटर असलेेले १००, ऑक्सिजन असलेले ७८३ बेड ग्रामीण भागात आणि शहरात १०९ व्हेंटिलेटर व ३९८ ॲाक्सिजनचे बेड आहेत. शहर व ग्रामीण भागात सध्या रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. पण लस घेतली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. बाहेर जाताना मास्क, सार्वजनिक ठिकाणी झालेला स्पर्श यापासून संरक्षण मिळविण्यासाठी सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे. घरातील ज्येष्ठ मंडळीचे संरक्षण करण्यासाठी कामानिमित बाहेर पडलेल्यांनी पुन्हा घरात जाताना अंगावरील कपडे निर्जंतुक करावेत, आंघोळ करूनच घरात प्रवेश करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व तालुक्यात कोरोना
माझं गाव कोरोनामुक्त मोहिमेमुळे ग्रामीण भागातील अनेक गावे कोरोनामुक्त झाली होती. इतकेच काय तर काही तालुके कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असतानाच आता पुन्हा कोरोनाची लाट आली आहे. सर्व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कामानिमित्त नागरिकांचे होणारे स्थलांतर व खबरदारी न घेतल्याने संसर्ग वाढला आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनामुक्त गाव मोहीम तीव्र करण्यात आली असून, फिजिकल, डिस्टन्स, मास्कचा अंमल कडकपणे करण्याच्या सूचना झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत. मोहीम रुजविण्यासाठी झेडपी कर्मचाऱ्यांच्या स्टेटसवर त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.