उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. बागायती क्षेत्रात वाढ होत असताना खरिपाचे क्षेत्र दरवर्षी घटत चालले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात उडीद, मूग, मका, सूर्यफूल ही पिके घेतली जातात; परंतु गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांत फेरपालट केल्याचे चित्र समोर आले आहे. खरीप हंगामातील बाजरी, ज्वारी, मका या तृणधान्यांची जागा आता सूर्यफूल, सोयाबीन या गळीत धान्याने घेतली आहे.
जून महिन्यांपासून कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सुरुवातीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने काही भागांत पेरण्या खोळंबल्या तर काही भागांत दुबार पेरणीचे संकट होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला. सरासरीच्या ९० टक्के पेरण्या झाल्या. जिल्ह्यात २ लाख ३४ हजार ६४१ हेक्टर खरिपाचे सरासरी क्षेत्र असून, २ लाख १२ हजार २२६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
------
सोयाबीनकडे का वाढता ओढा?
खाद्यतेलाचे भाव सतत वाढत आहेत. त्यामुळे सूर्यफूल, सोयाबीन या तेलबियांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. राज्यभरात ही स्थिती आहे. गतवर्षी सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला होता. हंगाम संपताना ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता. तेलाचे दर वाढल्याने सोयाबीन दुप्पट दराने विकले गेले. हेही त्यामागचे आणखी एक कारण आहे. हार्वेस्टर मशीनमुळे मजुरांच्या समस्येवर मात करता आली. काढणीच्या खर्चात कपात झाल्याने उत्पादन खर्चात बचत होऊ शकली.
-------
जिल्ह्यातील खरीप पेरणीची आकडेवारी (हेक्टर)
पिकाचे नाव सरासरी पेरणी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र टक्के
तूर ६८०१३ ५६९७४ ८३.७७
उडीद ३६०६४ ४४१९८ १२२.५६
सोयाबीन ३७८११ ४८६८९ १२८.७७
-----
एकूण पेरणी क्षेत्र २३४६४१ २१२२२६ ९०.४५
( खरीप हंगाम संपूर्ण)
----------
जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम चांगला आहे. सरासरीच्या ९० टक्के पेरण्या झाल्या. जूनपासून पर्जन्यमान चांगले आहे. सोयाबीनचा पेरा वाढला आहे. कडधान्ये, तृणधान्याचे प्रमाण त्या तुलनेत कमी होताना दिसून येते.
- रवींद्र माने, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर