करमाळा : निम्मा पावसाळा संपत आला तरी अद्याप एकही मोठा पाऊस करमाळा तालुक्यात पडलेला नाही. पाऊस हुलकावणी देत असल्याने ४ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावर उभी खरीप पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. भविष्याची चिंता शेतक ºयांना सतावू लागली आहे.
करमाळा तालुक्यात रोहिणी नक्षत्रात पावसाचा फक्त शिडकावा झाला. त्यानंतर मृग,आर्द्रा, पुनर्वसू व पुष्य ही चारही नक्षत्रे कोरडी गेली आहेत. आकाशात ढगांची गर्दी होते; पण दोन..चार थेंब पडतात व पाऊस गायब होतो, असे चित्र सध्या करमाळा तालुक्यात आहे. रोहिण्या बरसल्यानंतर शेतकºयांनी पावसाच्या भरवशावर जमिनीची मशागत केली.
तालुक्यात खरीप अंतर्गत बाजरी ४४४ हेक्टर, मका १०७८ हेक्टर, तूर १५१६ हेक्टर, मूग ४२० हेक्टर, उडीद ६१६ हेक्टर, सूर्यफूल १४५ हेक्टर पेरण्या झाल्या असून, पेरलेले बी उगवलेही, पण पाऊस दररोज हुलकावणी देत असल्याने चिंता वाढली आहे. करमाळा तालुक्यात शेतजमिनीचे एकूण १ लाख ५७ हजार ७२४ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी लागवडयुक्त शेती १ लाख २७ हजार ५६१ हेक्टर क्षेत्र आहे.
रब्बी पिकाचा तालुका म्हणून करमाळा शासनदरबारी नोंदलेला आहे. गतवर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडल्याने खरिपाची १३ हजार ५९१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा मात्र ४ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावरच खरीप पेरण्या झालेल्या आहेत.
सरासरी ७७.३१ मि. मी.पावसाची नोंद- करमाळा तालुक्यात आठ महसूल मंडळे असून, प्रत्येक मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये आजअखेर पडलेला पाऊस- करमाळा १३६.५ मि. मी., जेऊर ८२ मि. मी., सालसे ६७ मि. मी., कोर्टी १०१ मि. मी., केम ५६ मि.मी., अर्जुननगर १२ मि. मी., केत्तूर ६१ मि. मी., उम्रड १०३ मि. मी. याप्रमाणे सरासरी ७७.३१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जलसाठे कोरडेच..- करमाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने ब्रेक दिल्याने मांगी लघुप्रकल्पात २० टक्के पाणीसाठा असून, वडशिवणे, राजुरी, पारेवाडी, हिंगणी, नेरले, म्हसेवाडी, कुंभेज, सांगवी, वीट हे सर्व मध्यम प्रकल्प कोरडे पडलेले आहेत. ८० टक्के विहिरी, ४८ टक्के पाझर तलाव क ोरडे असून, सीना नदीवरील तीन कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयात पाण्याची पातळी तळपातळीत असून, सीना नदी अद्याप वाहिलेली नाही.