पूर येऊनही बलवडी, वाटंबरे, सांगोला, सावे हे चार बंधारे कोरडे असल्याने शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता टेंभूच्या उन्हाळी आवर्तनाकडे लागल्या आहेत.
चालू वर्षी सांगोला तालुक्यात परतीचा अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्यातून वाहणाऱ्या माण, कोरडा आफ्रूका नद्यांसह ओढ्यानाल्यांना पूर आला होता. या नद्यावरील बंधारे तुडुंब भरून वाहल्याने पुरामुळे बलवडी, वाटंबरे, सांगोला व सावे असे चार बंधारे फुटून बाजूचे भरावे वाहून गेले होते.
दरम्यान बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा असल्याने नदीच्या दुतर्फी असणाऱ्या शेतकऱ्यांनी ज्वारी, मका, ऊस ,गहू, हरभरा आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. सध्या डाळिंबासह सर्वच पिके जोमात आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शेतकरी बंधाऱ्यातून पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करीत असल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. सद्यस्थितीला एक महिना पुरेल इतका पाणी साठा बंधाऱ्यात उपलब्ध आहे.
अतिवृष्टीच्या पावसात नदीवरील चार बंधारे फुटून पाणी वाहून गेले. अतिवृष्टीचा पाऊस होऊनही चार बंधाऱ्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना सध्या पाणी.. पाणी.. म्हणून घशाला कोरड पडू लागली आहे. मार्च महिन्यात शेतकऱ्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी आता टेंभू योजनेतून उन्हाळी आवर्तन कधी सोडले जाणार याकडे लक्ष देऊन आहे.
फोटो ओळ- माणनदीवरील कडलास बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांनी दरवाजांना प्लास्टिक कागद लावून ते रोखण्याचा प्रयत्न केल्याचे छायाचित्रात दिसत आहे.
बंधाऱ्यातील उपलब्ध पाणीसाठा
दलघफूटमध्ये व टक्केवारी पुढील प्रमाणे- कोरडा नदीवरील आलेगाव - ९.१९ (२३.६९ टक्के) व मेडशिंगी - ६.५१ ( २२.६२ टक्के) माण नदीवरील खवासपूर - ८.११ (१३.९१), लोटेवाडी -३.१५ (७.९८ टक्के), नाझरे- ७.९८ (१३.९८ टक्के), अनकढाळ- ३३.२८ (१७.५० टक्के) , कमलापूर -११.८१(९.८४ टक्के), अकोला - वासूद - ७.४२(१०.३ टक्के), कडलास -१६.८५ (२३.६४ टक्के), सांगोला -१.३२(१.६७ टक्के), वाढेगाव- १३.४७ (१६.६२ टक्के), बामणी -३१.३१(३१.७५टक्के ), मांजरी -९.९८(१४.७८टक्के), मेथवडे- १६.४८(२३.२१ टक्के) तर बलवडी, सावे , चिणके ,वाटंबरे या चार बंधाऱ्यात पाणीसाठा निरंक आहे.
----