सोलापूर : सकल मराठा समाजाच्या वतीने अहिल्यादेवी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माळशिरस शहरातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. यावेळी जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेचा निषेध करीत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले. अनेक ठिकाणी बंद व मोर्चे निघाले. माळशिरस शहर मराठा समाजाने या घटनेचा तीव्र निषेध करत मंगळवारी शहरात संपूर्ण व्यवहार बंद पाळण्याचे आवाहन केले होते.
या बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दर्शवीत बंदमध्ये सहभाग नोंदवला. त्यामुळे शहरातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एसटी तुरळक वाहतूक सुरू होती. तसेच प्रवासी वाहतूक रिक्षा पूर्णपणे बंद होत्या. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या सर्वच नागरिकांनी शहरात येणे टाळल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. शहरात सर्वत्र बंद असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.