सोलापूर : महापालिकेने वालचंद अभियांत्रिकी इन्स्टिट्यूटच्या मदतीने शहरातील रस्त्यांच्या सुरक्षेचे आॅडिट सुरू केले आहे. या अंतर्गत शांती चौकात सलग २४ तास सर्वेक्षण करण्यात आले.
महापालिका पहिल्या टप्प्यात शांती चौक आणि आसरा चौकातील रस्त्यांच्या सुरक्षेचे आॅडिट करणार आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता शांती चौकात वालचंद इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणाला सुरुवात केली. याबाबत महापालिकेच्या रस्ते विभागाचे अभियंता संजय बुगडे म्हणाले, या सर्व्हेमध्ये प्रत्येक लेनमधून समोरील तीन दिशेला धावणारी वाहने, वाहनांची संख्या यांची दर १५ मिनिटांना नोंद करण्यात आली.
विविध दिशेला जाणाºया पादचाºयांची संख्याही नोंद करण्यात आली. सलग २४ तास चालणाºया या सर्वेक्षणातून रस्ते वाहतुकीसंदर्भात काही सुधारणा मांडण्यात येणार आहेत. पुढील मंगळवारी आसरा चौकात सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
यावेळी वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे, स्थापत्य विभागाचे प्रमुख डॉ. एस. एम. पाटील, प्रा. सचिन देशमुख, प्रा. अशोक कुमार, प्रा. सतीश थळंगे, एम.बी.ए़ विभागाचे प्रा. गोडबोले, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे, वीरेंद्रसिंग बायस आदी उपस्थित होते.