करमाळा : मराठीत एक म्हण आहे ‘आजारापेक्षा उपचार वाईट’ असाच काहीसा प्रकार करमाळा पोलिसांनी कोरोनावर प्रतिबंध करताना केल्याचे दिसते. जिल्ह्याच्या सीमा बंद करायला सांगितल्याने या बहाद्दरांनी रस्ताच जेसीबी च्या साहाय्याने खोदला आणि यामुळे एकजणाला जिवाला मुकावे लागले. हृदयरोगाचा झटका आला. वेळेच उपचार करता न आल्याने शिवाजी डफळे (वय- ६५, रा.कोंढार चिंचोली.) कोंढार चिंचोली पुलाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
शासनाने कोरोना व्हायरस रोखण्यासाठी गंभीर पावले उचललेली आहेत मात्र या उपायांचा अर्थ चुकीचा काढल्यामुळे अनेकांच्या जीवावर ती बेतल्याचं पाहायला मिळत आहे. शासनाने जिल्हा बंदीचे आदेश काढल्यामुळे पोलिसांनी सर्व व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. सोलापूरवरून पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी कोंढार चिंचोली वेपुलाजवळ पोलिसांनी रस्ताच खोदल्या मुळे हृदय विकाराच्या रुग्णाचा जीव गेल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.
शासनाने पोलिसांना कोरोनावरती प्रतिबंध करण्यासाठी विशेष अधिकार दिले आहेत. याबरोबरच संचारबंदी जमावबंदी सारखे कायदे देखील लागू केले आहेत. या कायद्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे झाली तर कोणालाही त्याची अडचण होणार नाही, मात्र काही ठिकाणचे पोलीस आपल्यावरील ताण कमी करण्यासाठी चुकीचा पर्यायर् अवलंबत असल्याचे दिसत आहे. कोंढार चिंचोली पुलाजवळ पोलिसांनी बॅरिकेट लावणे किंवा स्वत: उपस्थित राहून रस्ता बंद ठेवणे अपेक्षित आहे, मात्र पोलिसांनी तसे न करता रस्ताच जेसीबी मशिनच्या साह्याने खोदल्यामुळे कोंढार चिंचोली मधील रहिवाशी शिवाजी सोपान डफळे यांना हृदयविकाराच्या झटक्या मध्ये आपला जीव गमवावा लागल्याचे या भागातील नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे. डफळे यांना वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता मात्र पोलिसांच्या या अघोरी पयार्याने त्यांचा जीव गेला आहे, असे म्हटले जात आहे.
वेळेत उपचार न मिळाल्याने झाला मृत्यू- कोंढार चिंचोलीचे रहिवासी शिवाजी सोपान डफळे या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू उपचार वेळेत न मिळाल्यामुळे झाल्याने सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजी डफळे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, त्यांच्या मृत्यूची जबाबदारी करमाळा पोलीस स्वीकारणार आहेत का ? असाही सवाल सर्वसामान्यातून विचारला जात आहे.