महाळुंग-गट नं. २ हे गाव माळशिरस तालुक्यातमध्ये येत आहे. विधानसभा निवडणुकीत हे गाव माढा मतदारसंघाला जोडले आहे. दोन तालुक्यांचे आमदार लाभलेल्या गावचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. असे ग्रामस्थांना वाटले. पण प्रत्यक्षात दोन्ही तालुक्यातील आमदारांनी या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. याच आमदारांनी माळशिरस व माढा तालुक्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे मंजूर करून आणली; परंतु दोन्ही आमदारांनी या गावच्या रस्त्याचा पाठपुरावा न केल्याचे याचे काम रखडले आहे. प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होतो. त्याचा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
४० वर्षे रस्ता दुरूस्तीच्या प्रतीक्षेत
येथील लोकसंख्या जवळपास चार हजारांपर्यंत पोहोचली आहे. या ठिकाणी कोणत्याही पायाभूत सुविधा राबविल्या जात नाहीत. गट नं. २ ते महाळुंग हा रस्ता पंचायत समिती व जिल्हा परिषदेअंतर्गत येतो. लोकप्रतिनिधी फक्त सांगतात लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला आहे; पण प्रत्यक्षात तो वापरला जात नाही. गेली ४० वर्षे हा रस्ता दुरूस्तीसाठी प्रतीक्षेत आहे. येथील नागरिकांनी याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे वारंवार निवेदन देऊनही काम पूर्ण झाले नाही. याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.