शहाजी फुरडे-पाटील
बार्शी : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून संत-महंतांचे पालखी सोहळे पंढरीच्या वाटेवर विठुनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत आहेत़ बार्शी म्हणजे मराठवाड्याचे प्रवेशद्वार. त्यामुळे पंढरीला जाताना वाटेवर असलेल्या बार्शीमधून विदर्भ-मराठवाड्यासह मध्य प्रदेशातून येणाºया व शेकडो वर्षांची वारीची परंपरा असलेल्या सुमारे नव्वदच्या जवळपास दिंड्या व पालखी सोहळे बार्शीत मुक्काम करून व भगवंताचे दर्शन घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात.
विशेष म्हणजे बार्शीतून जाणाºया दिंड्यांमध्ये प्राधान्याने विदर्भातील अमरावती, नागपूर, बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील दिंड्यांचा समावेश आहे़ यातील अनेक दिंड्यांना शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे़ यातील कित्येक दिंड्या या पाचशेपेक्षा जास्त कि़मी़चे अंतर पायी चालत येत आहेत़ येथील भगवंत मंदिर, राम मंदिर, उत्तरेश्वर मंदिर, कृष्ण मंदिर आदी ठिकाणी या दिंड्यांचा मुक्काम असतो़
विदर्भातील गणोरी (जि़ अमरावती) येथील शिवकालीन मुस्लीम संत महंमद खान महाराज हे पूर्वी घोड्यावरून पंढरीची वारी करीत असत. त्यांच्या निधनानंतर वारीची ही परंपरा खंडित झाली होती़ त्यांचे शिष्य अनिल महाराज देशमुख यांनी मागील काही वर्षांपासून महंमद खान यांच्या नावाने पायी दिंडी सोहळा सुरू करून त्यांची परंपरा सुरू ठेवली़ शिवकालीन संत असलेले संत महंमद खान यांची दिंडी सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानली जाते़ अनिल महाराज देशमुख महाराज हे एस़ टी. मध्ये चालक असून, मागील अनेक वर्षांपासून आषाढी वारीसाठी ते दीर्घ रजा घेऊन सुमारे २०० वारकºयांसमवेत ३० मुक्काम व ६५० कि़मी़चे अंतर पार करून ही वारी पंढरपूरला नेतात़
या आहेत प्रमुख दिंड्या- भाकरे महाराज दिंडी, पापा महाराज देगलूरकर, संत बाळाभाऊ महाराज पिंपळे-मेहकर, संत भोजाजी महाराज हिंगणघाट, संत साधू महाराज कंधार, संत वासुदेव महाराज अकोट, नाना महाराज भक्तधाम बीड, संत गुलाबराव महाराज चांदुरबाजार, संत गाडगे महाराज मंगरुळनाथ वाशिम, गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव अकोट, नाना महाराज दिंडी इस्लामपूर अमरावती, महंमद खान पायदळ वारी गणोर, पांडुरंग महाराज पाटकर टाकळी बु, या व अशा शेकडो दिंड्या बार्शीमार्गे पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत तर काही येत आहेत़