दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री मुस्ती तीर्थ परिसरात दुपारनंतर ढग जमा झाले. वादळाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. जवळपास अर्धा तास हा पाऊस सुरू होता. तासाच्या विश्रांतीनंतर रात्री पुन्हा उशिराने पावसाची रिपरिप सुरू झाली.
शेतकरी हंगामपूर्व मशागतीच्या तयारीत आहेत. मे महिन्याच्या नंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे वेध लागले होते. जमिनीची मशागत करण्याच्या कामाला वेग आला होता. मृग नक्षत्र येण्यापूर्वी ही मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या धावपळ सुरू आहे. शुक्रवारी दुपारनंतर रोहिणी नक्षत्राच्या आगमनाने मशागतीच्या कामांना काहीसा ब्रेक लागला.
--------
सुतार कट्ट्यावर गर्दी वाढली
खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शेतकरी मशागतीची अवजारे बनवण्याच्या तयारीला लागले आहेत. लाकडी तिफण, कुळव, दांड्या आधी नादुरुस्त लाकडी अवजारे दुरुस्त करण्यासाठी तसेच नवीन अवजारे बनवण्यासाठी गावोगावी सुताराच्या कट्ट्यावर शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे. एरव्ही, मृग नक्षत्राच्या आगमनानंतर ही वर्दळ सुरू व्हायची. मात्र, यंदा लवकरच पावसाळी वातावरण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी गेल्या पंधरवड्यापासून पेरणीपूर्व कामे हाती घेतल्याचे दिसून आले.
-------
आता बी-बियाणांसाठी धावपळ
रोहिणी नक्षत्राचा पाऊस आल्याने वेळेवर खरिपाच्या पेरण्या करण्याची संधी चालून आली आहे. जून महिना सुरू झाल्यापासून शेतकरी बाजारातील उपलब्ध बी-बियाणांचा कानोसा घेत आहेत. शुक्रवारी झालेल्या पावसाने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता बी-बियाणे उपलब्ध करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होईल.
----