राकेश कदम, सोलापूर: मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरायांनी काँग्रेसच्या सदसत्वाचा राजीनामा दिला. मिलिंद देवरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. मिलिंद देवरा यांनी आपला विचार सोडून केवळ पदासाठी इतर पक्षात जाणे योग्य नाही. मिलिंद देवरा यांनी विचारांना प्राधान्य द्यावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी दिला.
येथील श्रमिक पत्रकार संघात रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, मिलिंद देवरा यांचे वडील अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी कधी पक्ष सोडण्याचा विचार केला नाही. लोकसभा उमेदवारीच्या विषयावरून त्यांनी काँग्रेस सोडल्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. परंतु त्यांनी आज विचार भक्कम करण्याची गरज असताना विचार सोडणे चुकीचे आहे.
पवारांची आरोग्यमंत्र्यांवरही टीका
राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये महिला आणि मुलांची औषधे नाहीत. खोकल्यांच्या औषधांचा तुटवडा आहे. आरोग्य खात्यातील अधिकारी आणि नेते या विभागाकडे लक्ष देण्याऐवजी या विभागात घोटाळे करण्याचे काम करीत आहेत. जिथे ते निवडणूक लढवणार आहेत त्या भागात आरोग्य शिबीर घेण्यासाठी इतर भागातील औषधे वळवले जात आहेत. आरोग्य मंत्री हे एका मतदारसंघाचे नसून राज्याचे आहेत, असेही रोहित पवार यांनी सांगितले.