राकेश कदम, साेलापूर: याेगगुरु रामदेवबाबा यांनी ओबीसी समाजाचा अवमान करणारे वक्तव्य केले. या रामदेवबाबांचा निषेध करण्याची हिंमत अजितदादा मित्र परिवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गटात आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांनी रविवारी येथे उपस्थित केला.
ग्रामदैवत सिध्देश्वर महाराज यांच्या यात्रेसाठी राेहित पवार साेलापुरात आहेत. यात्रेत सहभागी हाेण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे-पाटील हे राेहित पवार यांच्या सल्ल्यानुसार काम करतात, असा आराेप राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला हाेता. या संदर्भातील प्रश्नावर राेहित पवार म्हणाले, छगन भुजबळ हे दाेन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या मंचावर हाेते. मराठा आरक्षण, लिंगायत आरक्षण, धनगर आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून घटनात्मक दुुरस्ती करणे आवश्यक आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासमाेर आरक्षणाचा अ काढण्याचे धाडस यांच्यामध्ये झाले नाही. हेच भुजबळ मंचावरुन रस्त्यावर आल्यानंतर मंत्री असल्याचे विसरुन जातात. मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर आराेप करतात. भुजबळांनी जातीय तेढ निर्माण करण्याचे काम थांबवावे. दाेन दिवसांपूर्वी रामदेवबाबा यांनी ओबीसींचा अवमान करणारे वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध करण्याचे धाडस यांच्यात नाहीत. अजितदादा मित्र परिवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गटात निषेध करण्याची हिंमत आहे का, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.