- गोपालकृष्ण मांडवकर पुरंदावडे (जि. सोलापूर) : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा बुधवारी दुपारी पुरंदावडे येथे पार पडला. माऊलींच्या अश्वांनी घातलेले रिंगण, टाळ-मृदंगाचा गजर अन् माऊलींच्या जयघोषातील हा सुखसोहळा लक्षावधी नेत्रांनी अनुभवला. रिंगण सोहळ्यानंतर दिंडीकऱ्यांचा उडीचा खेळ रंगला अन् सजलाही.नातेपुते येथील पालखी तळावरील मुक्काम आटोपून बुधवारी सकाळी ६ वाजता पालखी सोहळा मांडवी ओढ्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. मांडवी ओढा परिसरात माऊलींचा दुपारचा नैवेद्य झाल्याने लांबवरची चाल करून आलेले वारकरीही काही काळ विसावले. त्यानंतर दुपारी माऊलींच्या निघण्याची तयारी झाली. गोल रिंगण आणि उडीच्या खेळाच्या आतुरतेने सोहळा पुरंदावडेला पोहोचला. गोल रिंगणचे मैदान दुपारपासूनच गर्दीने फुलून गेले होते. दुपारी पावणेतीन वाजता माऊलींच्या रथाचे आगमन झाले. जरीपटक्याचे निशाण असलेल्या स्वाराच्या अश्वाने रिंगणात प्रवेश केला.त्यापाठोपाठ वैष्णव मेळा पोहोचताच लाखोंच्या जनसमुदायाने टाळ्यांचा गजर केला. माऊली-माऊली अशा जयघोषात माऊली बाहेरचे गोल रिंगण फिरून मानाच्या दिंड्यांसह रिंगणस्थळी सजवलेल्या चबुतºयावर विराजमान झाली. गोल रिंगण पूर्ण झाल्यावर परंपरेनुसार चोपदारांनी सर्व दिंड्यांना उडीच्या खेळाचे निमंत्रण दिले. वारीतील हा सर्वांग सुंदर सोहळा असतो. माऊली आणि विठ्ठलाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या साथीने उडीचा खेळ तब्बल २० मिनिटे रंगला. वारीतील शीणभाग विसरून दिंडीकरी या खेळात तल्लीन झाले होते. गोलाकार पद्धतीने बसून भाविकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला.
पुरंदावडेत माऊलींचे गोल रिंगण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 4:43 AM