सोलापूर : अतिगर्दीचे ठिकाण म्हणून रेल्वेस्थानक असल्याने जेणेकरून महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांकडे पाहिले जाते. अतिरेक्यांची नजर अशाच ठिकाणी असते, हा धागा पकडून रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी आज (शनिवारी) पाचही प्लॅटफॉर्मसह उद्यान गाडीची श्वान पथकाद्वारे तपासणी केली. श्वान रॅम्बोने तपासणी करून ‘नो टेन्शन’ असाच दिलासा प्रवाशांना दिला. आरपीएफचे जवान अंकुश खंदारे आणि श्वानला हाताळणारे रमेश पागे यांनी प्लॅटफॉर्म क्रमांकवर फेरफटका मारून संशयित प्रवाशांवर करडी नजर ठेवण्याबरोबर प्रवाशांच्या प्रतीक्षा रुमची तपासणी केली. प्रवाशांकडील बॅगा, सुटकेस आदी वस्तूंचा वास श्वानपथक घेत होते. त्यानंतर उद्यान एक्स्प्रेसमधील वातानुकूलित डब्यांची तपासणी केली. कुठे काहीच संशयित वस्तू आढळल्या नाहीत. मंडल सुरक्षा आयुक्त विजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आता दररोज पाचही प्लॅटफॉर्म, महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या गाड्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. चेन्नईच्या प्रकरणानंतर आता सोलापूर लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ जवान अॅलर्ट झाले आहेत. स्थानक आणि सर्वच रेल्वे डब्यांमधील संशयित प्रवाशांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. प्रवाशांना एखाद्या संशयित प्रवाशाबद्दल शंका आल्यास अथवा एखादी बेवारस वस्तू पडली असेल तर अशांनी तातडीने लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ जवानांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------
पुण्याहून सोलापूरला आणि येथून पुण्याला जाणारी इंद्रायणी गाडी नेहमीच हाऊसफुल्ल असते. अशावेळी लोहमार्गचे अधिकाधिक पोलीस स्थानकावर उभे राहून प्रवाशांना रांगेत सोडण्याचे काम करीत असतात. प्रवाशांनी घाईगडबड न करता रांगेत जावे. जेणेकरून कुठला गोंधळ उडणार नाही. - अशोक सातपुते पोलीस निरीक्षक- लोहमार्ग