मध्य रेल्वे विभागात सौर ऊर्जासंबंधी निर्माण होणारा हा पहिलाच प्रकल्प असला तरी येथील नागरिकांना मात्र जुने नाशिकला गेलेले आरपीएफ ट्रेनिंग सेंटरच येथे असावे असे वाटत आहे. त्यामुळे आरपीएफ ट्रेनिंग सेंटरच्या जागेवर होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाला जरी थेट विरोध नसला तरी नाराजी मात्र नागरिक व्यक्त करीत आहेत.
चिंकहिल येथील सुमारे १४० एकराच्या जागेवर ते ट्रेनिंग सेंटर होते. तिथे सर्व सुखसुविधा उपलब्ध होत्या. अत्याधुनिक पद्धतीने जवानांना ट्रेनिंग दिले जायचे, पण अचानक रातोरात ट्रेनिंग सेंटर नाशिकला अवघ्या ४० एकरांच्या जागेवर स्थलांतरित केले आहे. यात एका अधिकाऱ्याने मनमानी केली असल्याच्या आरोप याअगोदरच रेल्वेच्या वरिष्ठांकडे कुर्डूवाडीतील अनेक संघटनांनी केला आहे.
चिंकहिलच्या ठिकाणी ब्रिटिशकालीही रेल्वेचे महत्त्वाचे सेंटर हाेते. ब्रिटिशांच्या नंतर भारत सरकारने या ठिकाणी आरपीएफचे ट्रेनिंग सेंटर सुरू केलेले होते. कालांतराने २०१६ साली हे ट्रेनिंग सेंटर रेल्वे बंद करून नाशिकला स्थलांतर केले आहे.
येथील १४० एकर जागेवर असलेले भव्यदिव्य अशा ट्रेनिंग सेंटरमध्ये दरवर्षी ८०० जवानांना ट्रेनिंग दिले जात होते. त्यांना विविध सुविधा पुरविण्यासाठी सुमारे २०० जणांचा रेल्वेचा इतर कायमस्वरूपी स्टाफदेखील येथे होता. सन २०१६ पासून शहरातील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी स्थलांतरित झालेले आरपीएफचे ट्रेनिंग सेंटर पुन्हा माघारी यावे म्हणून खूप प्रयत्नदेखील केले आहेत.
यादरम्यान सोलापूर रेल्वे विभागाने चिंकहिल येथील त्या मोकळ्या जागेत सौर ऊर्जा निर्मिती करण्याबाबत दोन प्रस्ताव पाठविले होते. त्यावरून रेल्वेच्या विविध स्टेशनावरील छतावर सौर ऊर्जा निर्मिती करण्याच्या प्रकल्पाला मान्यता न देता चिंकहिल येथील एकूण जागेंपैकी फक्त ८० एकर जागेवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाला दिल्ली बोर्डाने मान्यता दिलेली आहे व हिरवा कंदीलदेखील दाखविलेला आहे.
१६ मेगावॉट वीजनिर्मिती होणार
सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी याबाबत बोलताना सांगितले की मध्य रेल्वेच्या वतीने चिंकहिल येथे पहिल्यांदाच मोठा सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून पर्यावरणपूरक १६ मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. याचा उपयोग रेल्वेच्या विविध कार्यालयांसाठी होणार आहे. यामुळे रेल्वेच्या विजेच्या खर्चाची खूप बचत होणार आहे. साेलापूर विभागातील रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरील छतावरही वीजनिर्मिती भविष्यात केली जाऊ शकते. त्याबाबत दिल्ली बोर्डही सकारात्मक निर्णय घेऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
---
रेल्वेकडून चिंंकहिल येथे होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पास आमचा विरोध नाही. परंतु या ठिकाणी असलेले आरपीएफचे ट्रेनिंग सेंटर कुठल्याही सुविधा नसलेल्या नाशिकमध्ये नेले आहे. चिंकहिल येथे आता होणारा सौर ऊर्जा प्रकल्प नाशिकमध्ये करावा व नाशिक येथील स्थलांतरित आरपीएफ ट्रेनिंग सेंटर पुन्हा चिंकहिल येथे सुरू करावे. त्यासाठी रेल्वे विभागाने याला विशेष निधी देण्याची गरज आहे.
- महेंद्र जगताप, रेल्वे कामगार नेते
---