सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यापोटी शासनाने नुकसानभरपाईसाठी उत्तर तालुक्याला दोन टप्प्यांत २० कोटी ३० लाख ९३ हजार रुपये इतकी रक्कम दिली आहे. पहिल्या टप्प्यात २१ गावांतील नऊ हजार ३४३ शेतक-यांच्या खात्यावर १० कोटी ४० लाख ९८० रुपये जमा केले होते. दुस-या टप्प्यात आलेल्या १० कोटी १५ लाख ५६ हजार इतक्या रकमेपैकी सहा कोटी ६८ लाख सात हजार ८०० रुपये सात हजार ५२२ शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.
गावनिहाय आलेली रक्कम
अकोलेकाटी ६२ लाख ४६ हजार, गुळवंची १५ लाख ७८ हजार, कारंबा ४८ लाख ३५ हजार, मार्डी ४० लाख २४ हजार, नरोटेवाडी २० लाख २१ हजार, सेवालालनगर ५ लाख, डोणगाव-भाटेवाडी २१ लाख ६५ हजार, हगलूर १४ लाख ९३ हजार, तळेहिप्परगा एक लाख ७६ हजार, बेलाटी ३१ लाख, खेड ११ लाख २२ हजार, बाळे २१ लाख ४१ हजार, कोंडी ४३ लाख ३१ हजार, पाकणी ११ लाख ७७ हजार, हिरज १४ हजार, कळमण ५८ लाख २६ हजार, कौठाळी ३८ लाख २८ हजार, बाणेगाव २० लाख ६८ हजार, भोगाव ८ लाख ७० हजार, होनसळ ४० लाख ७३ हजार, राळेरास १८ लाख ९५ हजार, एकरुख- तरटगाव १४ लाख ८४ हजार, भागाईवाडी ४ लाख, नंदूर- समशापूर २९ लाख ८७ हजार रुपयांप्रमाणे बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. याशिवाय सोलापूर, शेळगी, वडाळा, तिर्हे मंडलातील लहान-मोठ्या गावातील रक्कमही जमा करण्यात आली आहे.
शेतक-यांना कोणी जुमानेना
उत्तर तहसील कार्यालयात अतिवृष्टीची नुकसानभरपाई कधी जमा होणार? हे गावोगावचे शेतकरी चौकशी करतात. मात्र, कोणीच माहिती देत नाहीत. गावात तलाठी येत नाहीत, रंगभवन, तहसील कार्यालयाच्या परिसरात शोधून तलाठी सापडले तर अतिवृष्टीच्या पैशांची तहसील कार्यालयात चौकशी करा, असे सांगतात. तहसील कार्यालयात मात्र उत्तर मिळत नाही.