सोलापूर - शिक्षणाचा अधिकार अंतर्गत शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेकांना अर्ज सादर करताना सर्व्हर डाऊनमुळे अडचणी आल्या होत्या. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
मोफत शिक्षणाचा अधिकार आरटीईअंतर्गत सध्या शासनातर्फे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहे. मात्र, शासनाची वेबसाइट ही स्लो असल्यामुळे अनेक पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरटीई २५ टक्केचे ऑनलाइन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन वेबसाइट स्लो होऊ शकते. याचा विचार करत पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, असा संदेश वेबसाइट दर्शविण्यात आला आहे. आणखी आठ दिवस मुदतवाढदरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येत आहे. यासाठी १ मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ मार्च रोजी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, पालकांच्या मागणीवरुन मुदत वाढ देण्यात आली असून २५ मार्च रात्री १२ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. मात्र, २५ मार्चनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही असे प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.